जगभरात करोना विषाणू ने थैमान घातले असून आपल्या देशात महाराष्ट्रात करोनाचे जास्त संशयित रुग्ण आढळले आहेत. राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाकडून ही संसर्गजन्य साथ आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून विषाणूचा संसर्ग होवू नये तसेच साथीचा प्रसार रोखण्यासाठी विविध उपाययोजना व निर्बंध लागू केले आहेत. त्याचाच एक भाग आणि दक्षता म्हणून गर्दी टाळण्यासाठी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने दि. 31 मार्च 2020 पर्यंत साखर विक्री बंद ठेवली असून याची नोंद कारखान्याच्या सभासदांनी घ्यावी असे आवाहन कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी केले आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सद्स्थितीमध्ये करोना विषाणूंचा सर्वत्र प्रसार होत आहे. देशामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक संशयित रुग्ण असल्याचे दिसून आले आहे. करोना विषाणूचा संसर्ग होऊ नये या पार्श्वभूमीवर शासनाकडून निर्बंध लागू केलेले असून प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पावले उचलेली आहेत. यावर उपाय योजना म्हणून दहा किवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र जमण्यास जिल्हाधिकारी सातारा यांनी मनाई आदेश जारी केला आहे.
या दृष्टचक्रातून सावरण्यासाठी व रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या आदेशाचे पालन करणे आवश्यक असल्याने अजिंक्यतारा कारखान्याकडील सभासद साखर विक्री दि.३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्यात येत आहे. या कारणाने ज्या सभासदांची साखर शिल्लक राहील अशांना माहे एप्रिल २०२० मध्ये साखर वाटप करण्यात येईल याची सर्व सभासदांनी नोंद घ्यावी, असे देसाई यांनी सांगितले आहे.