महाबळेश्वर व वाई तालुक्यात आता कोरोना पॉझिटिव्ह असलेले रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. ही संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तेव्हा येथील कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यांनी अधिक सतर्क व जबाबदारीने राहिले पाहिजे. कामातील दुर्लक्ष व हलगर्जीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही. हलगर्जीपणा निदर्शनास आला तर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा आमदार मकरंद पाटील यांनी तालुका आढावा बैठकीत दिला. या वेळी प्रांताधिकारी संगीता राजापूरकर उपस्थित होत्या.
बेल एअर पाचगणी येथे 100 बेडचे कोरोना केअर सेंटर तयार करण्याची सूचना आमदार पाटील यांनी या बैठकीत केली. बेड व काही व्हेंटिलेटरची व्यवस्थाही करण्याची सूचना प्रशासनास करण्यात आली. भविष्यात रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून प्रशासनाने 31 डॉक्टरांची टीम तयार केली आहे. यापैकी तीन-तीन डॉक्टर हे तीन पाळ्यांमध्ये काम करतील. पहिले सात दिवस काम केल्यानंतर डॉक्टरांना एका हॉटेलमध्ये सात दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात येणार आहे.
त्यानंतर सात दिवस त्यांना त्यांच्या घरातच क्वारंटाइन करण्यात येणार आहे. अशा प्रकारे सर्व डॉक्टरांना 14 दिवसांची विश्रांती मिळाल्यानंतर पुन्हा सात दिवस त्यांना कामावर घेण्यात येणार आहे. या बैठकीला ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे, माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, संजय गायकवाड, अफजल सुतार आदी मान्यवर उपस्थित होते. नगरसेवक संजय पिसाळ यांनी आभार मानले.