सातारा/प्रतिनिधी
साहित्यसेवेचा वारसा घेवून काम करतानाच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेने सातारची अर्थवाहिनी असलेल्या जनता सहकारी बँकेच्या सहकार्याने कोरोनाच्या संकटात अत्यवस्थ असलेल्या रुग्णांसाठी तब्बल ११ ऑक्सीजन मशिन उपलब्ध केल्या आहेत. जनता सहकारी बँकेमार्फत त्या रुग्णांना उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. अशा प्रकारचा उपक्रम राबवणारी शाहूपुरी शाखा ही महाराष्ट्रातील एकमेव साहित्यसंस्था ठरली आहे, अशी माहिती शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी व जनता सहकारी बँकेचे चेअरमन अतुल जाधव यांनी दिली.
कोरोना रुग्णांमध्ये रात्री-अपरात्री आणि केव्हाही ऑक्सीजनची पातळी कमी होण्याची समस्या निर्माण होते. अचानकपणे ही समस्या निर्माण झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये बेड शोधण्यापासून सुरुवात होते. बेड मिळेपर्यंत रुग्ण जीवन-मृत्यूशी झुंज देत असतो. त्या कालावधीत त्याला ऑक्सीजनची गरज असते. ही गरज ओळखून महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा आणि जनता सहकारी बँकेने एकत्रित येत देणगीदारांच्या सहकार्याने तब्बल ११ ऑक्सीजन मशीन घेतली असून ती सातारकर जनतेच्या सेवसाठी उपलब्ध केली आहेत. ही सर्व मशिन ज्यावेळी लागतील त्यावेळी रुग्णांना देण्यासाठी जनता सहकारी बँकेची टिम कार्यरत राहणार आहे. २४ तास लोकांसाठी बँकेची टिम काम करणार आहे.
ही ऑक्सीजनची मशिन घेण्यासाठी प्रशांत सावंत, संतोष चौगुले, रोहित कुऱ्हाडे, अमर मोरे, गणेश चौगुले, विनायक इथापे, अॅड. राहूल खैरमोडे, नगरसेवक मनोज शेंडे, शिवाजी वर्णेकर, सागर लाहोटी, महेश शिंदे, आनंदराव कणसे, आणि जनता सहकारी बँक कर्मचारी संघ यांचे सहकार्य लाभले आहे. वेगवेगळ्या सामाजिक संस्थांनी यापूर्वी साताऱ्यात अशा ऑक्सीजन मशिनची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. परंतू साहित्य क्षेत्रात काम करणाऱ्या एकाही संस्थेने साताऱ्यायतच नव्हे तर महाराष्ट्रात अशा प्रकारचे काम कोरोनाच्या काळात केलेले नाही. साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना साहित्य परिषदेने हा उपक्रम राबवला आहे. त्यातून अनेक रुग्णांना दिलासा मिळेल.
सातारा शहर व परिसरात ज्यांना ऑक्सीजन मशिनची गरज असेल अशा रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी बँकेचे चेअरमन अतुल जाधव यांच्याशी मोबाईल क्र. ९७६७४९९२२३ वर संपर्क साधावा, असे आवाहन शाहूपुरी शाखेचे कार्याध्यक्ष नंदकुमार सावंत आणि बँकेचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब गोसावी यांनी केले आहे.