सातारा शहरात तब्बल नव्वद ठिकाणी गळती असल्याचे एका पाहणीमध्ये स्पष्ट झाले आहे . पाणीपुरवठा सभापती प्रकृती अस्वास्थामुळे रजेवर असल्याने या कामी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी पुढाकार घेतला आहे .
लिकेज काढण्यासाठी शहराच्या वेगवेगळ्या ठिकाणी दोन नळकरी चार बिगारी अशा सहा कर्मचाऱ्यांची सहा पथके दुरुस्तीसाठी रवाना करण्यात आली आहेत . दरम्यान पाणी पुरवठा विभागाच्या एका पथकाने बोगदा ते समर्थ मंदिर या मार्गावरील खाणीच्या मुख्य जलवाहिनीची मोठी गळती काढण्यात आली . मंगळवार पेठ ते बोगदा या दरम्यानच्या जलवाहिनीला मोठा जॉईंट क्रॅक गेल्याने पाणी प्रचंड दाबाने रस्त्यावर येत होते . ही मोठी दुरुस्ती करण्यात आली . याशिवाय गणेश टाकी, जेल टाकी, पॉवर हाऊस टाकी, राजवाडा टाकी, पोलीस कॉलनीची टाकी, गणेश मेळवणे टाकी, घोरपडे कॉलनी टाकी, चार भिंती टाकी, कात्रेवाडा टाकी, बुधवार नाका टाकी इ टाक्यांकडून जाणाऱ्या जलवाहिन्यांची तपासणी व दुरुस्तीची कामे धडाक्यात सुरू झाली आहेत . पाणी पुरवठा सभापती यशोधन नारकर प्रकृतीच्या कारणामुळे रजेवर असल्याने पाणी पुरवठा विभागाची सर्व सूत्रे उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी आपल्या हातात घेतली . कास आणि उरमोडी या जलस्त्रोतांचे दहा लाख दशलक्ष घनलीटर पाणी सातारकरांची तहान भागविण्यासाठी उचलले जाते मात्र जुन्या पाईप, मोडकळीस आलेले जोड , पाण्याचा प्रचंड दाब यामुळे सुमारे वीस ते बावीस टक्के पाणी वाया जाते त्यामुळे शहराच्या पश्चिम भागात विशेषतः बोगदा -समर्थ मंदिर परिसर- राजवाडा या मार्गावर कमी दाबाने पाणी येत असल्याची कायम ओरड होते . समर्थ मंदिर चौक ते शाहू चौक या मार्गावरही पाण्याची तीच ओरड ऐकायला मिळते . त्यामुळे घंटेवारी करणाऱ्यांना लिकेजेसची माहिती कळविण्याचे आवाहन उपनगराध्यक्षांनी केले होते . त्यानंतर प्रत्येक टाकीच्या जलवाहिन्यांवर साधारण सात ते आठ अशा तब्बल लिकेजेस आढळून आल्या . राजपथ व राधिका मार्ग वगळून लिकेजेस दुरूस्तीचे काम प्रगतीपथावर असून साधारण दोन दिवसात बावीस गळती काढण्यात आल्याचे पाणी पुरवठा विभागाच्या सूत्रांनी सांगितले . दोन नळकरी व चार बिगारी यांची दोन पथके पाणी पुरवठा विभागासाठी कायम सज्ज ठेवण्यात येणार असल्याचे उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी सांगितले .
शहापूर योजनेवर आता सीसीटीव्हीचा वॉच
सांबर वाडी फिल्टरेशन प्लँट व शहापूर पाणी पुरवठा योजनेचे उपळी येथील उपसा केंद्र येथे सीसीटीव्ही बसवण्याचे प्रस्तावित आहे . येथील कर्मचारी व पाणी उपसा तंत्रावर आता थेट नगरपालिकेतून वॉच राहणार आहे .कधी डीपी जळणे, उपसा पंप बंद पडणे, इतर तांत्रिक अडचणी सीसीटीव्हीमुळे थेट लक्षात येणार आहे . या कामाचे अंदाजपत्रक तातडीने तयार करण्याचे आदेश उपनगराध्यक्षांनी दिले असून पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व टाक्यांचे अद्ययावतीकरण होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले .