आरोग्य सभापती घोरपडे यांच्या पुढाकाराने पालिकेच्या कर्मचाऱ्यांची करण्यात आली तपासणी

53
Adv

सातारकरांप्रमाणेच पालिका कर्मचाऱ्यांचे आरोग्य निरोगीराहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी पालिकेकडून आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.अशी माहिती आरोग्य सभापती अनिता घोरपडे यांनी सातारानामाशी बोलताना दिली.

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या व आरोग्य सभापती अनिता घोरपडे यांच्या पुढाकारानेच हे शिबीर पार पडले असून करोनाचे संक्रमण वाढत असतानाही पालिकेचे चारशे कर्मचारी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी गेले पंचेचाळीस दिवस अहोरात्र झटत आहेत.

जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून पालिकेच्या बहुउद्देशीय सांस्कृतिक भवन येथे बुधवारी सकाळी अकरा वाजता आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक अमोद गडीकर, उपमुयाधिकारी संचित धुमाळ यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

सभापती अनिता घोरपडे म्हणाल्या, सातारा शहरात करोना बाधित रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होऊ लागली आहे. या विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी पालिकेची संपूर्ण यंत्रणा गेल्या पन्नास दिवसांपासून झटत आहे. धूर व औषध फवारणी बरोबरच कोरोनाबाधित रुग्ण दगावल्यास त्याच्या अंत्यसंस्कारापर्यंतची सर्व कामे अधिकारी व कर्मचारी जबाबदारीने पार पाडत आहेत. या कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी व्हावी अशी मागणी पुढे आली.

शिबिरात रक्तदाब, शरीरातील साखरेचे प्रमाण, सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी याची तपासणी करण्यात आली. तसेच शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण व थर्मल स्कॅनरद्वारे शारीरिक तापमानाची नोंदही घेण्यात आली. यावेळी कर्मचाऱ्यांना आयर्न व कॅल्शियमच्या गोळ्याही देण्यात आल्या. कोरोना सदृश आजार आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर पुढील उपचार केले जाणार आहेत.

बुधवारी पहिल्याच दिवशी जवळपास साडेतीनशे कर्मचाऱ्यांची तपासणी झाली. गुरुवारी उर्वरित कर्मचाऱ्यांची तपासणी केली जाणार आहे.

Adv