आरोग्य निरीक्षकांचा मस्तवालपणा कोणाच्या जीवावर ? गुडगुडी बाबाला वाचवण्याचा पालिका मुख्याधिकाऱ्यांचा आटापिटा

81
Adv

सातारा जिल्हयात जिल्हा प्रशासनाचा करोनाशी हातघाईचा संघर्ष सुरू आहे . अशा परिस्थितीत सातारा पालिकेच्या एका आरोग्य निरीक्षकाचा मस्तवालपणा प्रचंड वाढला आहे . परदेशवारी करून पुन्हा क्वारंटाइन नियमाचा भंग करणाऱ्या गुडगुडी बाबाच्या विरोधात गुन्हा दाखल होणे आवश्यक होते मात्र प्रशासनातले मुख्य कारभारीच मध्यस्थीसाठी पुढे आले आहेत .

पालिकेतल्या या आरोग्यपूर्ण राजकीय संबंधांची सातारा शहरात चर्चा सुरू आहे .आरोग्य विभागाचे एक वरिष्ठ निरीक्षक आणि त्यांची दुबई वारी करोना संसर्गाच्या पाश्र्वभूमीवर बरीच वादग्रस्त ठरली . त्यांनी रजा टाकून कोठे जावे हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न मात्र साताऱ्यात करोना संसर्गाचा धोका वाढल्यावर त्यांनी स्वतःहून सेल्फ डिक्लरेशन केले नाही . ही पहिली बौध्दिक दिवाळखोरी, त्यानंतर होम क्वारंटाईन होण्याऐवजी गुडगुडी बाबा साताऱ्यात फिरत राहिले, माघारी परतल्याचा एक साधा निरोप त्यांनी दिला नाही आणि आरोग्य तपासणी प्रक्रियेच्या दरम्यान त्यांनी प्रचंड आडगेपणाने वर्तन केले .गोडोली येथील आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना या प्रकरणाचा प्रचंड ताप झाला . गुडगुडी बाबांच्या या परदेश दौऱ्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार झाली .

क्वारंटाईन पिरियड चा भंग करून 9 एप्रिल रोजी गुडगुडी बाबा पालिकेत येऊन बसले . त्यांची नोटीस उपमुख्याधिकाऱ्यांनी बजावल्यावर बिथरलेल्या बाबांनी त्यांच्याशी हुज्जत घालत घरचा रस्ता पकडला . क्वारंटाईन चा भंग केल्याप्रकरणी अद्यापही त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही . यामागची राजकीय व प्रशासकीय साखळी मोठी आहे . शिस्तभंगाची कारवाई करणारी जी नोटीस मुख्याधिकाऱ्यांनी बजवायला हवी ती नोटीस शंकर गोरे यांनी फाईलमध्येच दाबून ठेवल्याने या प्रकरणात कुठेतरी पाणी मुरतेय ? हे स्पष्ट व्हायला लागले आहे . मात्र कारवाईचा भाग म्हणून गुडगुडी बाबाचे एकवीस दिवसाचे वेतन कापले गेल्याची खात्रीशीर माहिती आहे . या प्रकरणावर सुद्धा बाबाने बरीच आदळआपट केली तरी पण टोकाची कारवाई न झाल्याने प्रशासनात बाबाचे चांगलेच वजन असल्याचे स्पष्ट झाले .

चौकट –

आरोग्यपूर्ण संबंधासाठी मग काहीही ………

पालिकेत हजेरी पटावर असलेले आरोग्य कर्मचारी व कागदोपत्री कामावर असणारे कर्मचारी याची किमान वेतन कायद्याप्रमाणे तब्बल सतरा लाख रू आर्थिक जुळवाजुळव आणि ती बिले वित्त विभागातून बाहेर काढणे, टक्केवारीचा हिशोब लावून तो संबधितांकडे वर्ग करणे, आरोग्य ठेकेदारांकडून पक्ष निधीच्या नावाखाली वसूल करणे इं वजनदार कामे या गुडगुडी बाबाकडे असतात . त्यात बाबासह अनेकाची टक्केवारी असते . या अनेकांमध्ये प्रशासनातले महत्वाचे अधिकारी सुद्धा सामील आहेत . आणि या बाबावर कारवाई न होण्याची हीच खरी मेख आहे . म्हणून गुडगुडी बाबाचा मस्तवालपणा खपवून घेतला जात आहे . स्वतः मुख्याधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून गुडगुडी बाबावरील कारवाईचे प्रकरण मिटवल्याचा आश्वासक निरोप दिल्याचे खात्रीशीर वृत्त आहे . गुडगुडी बाबाचे राज्य मंत्रीमंडळातील एका राज्यमंत्र्यांशी गृह अगदी सलोख्याचे संबंध आहे . हा राजकीय सलोखा गुडगुडी बाबा सोयीस्करपणे वापरून राजकीय मस्तवालपणा करित असल्याची चर्चा आहे .

Adv