प्रचंड वाऱ्यासह पावसाने साताऱ्याला झोडपून काढले. काही मिनिटे झालेल्या या पावसाने सर्वत्र पाणीच साटुण राहिले.
हवेमध्ये प्रचंड उष्णता असल्यामुळे एसी, कुलर, पंखे लावून नागरिक उष्णतेपासून आपला बचाव करत होते. आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अचानक सोसाट्याचा वारा सुटत वळीव पावसाने हजेरी लावली. त्याचसोबत गाराही पडल्या, सुमारे वीस मिनिटे पाऊस पडत होता. या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी साचले होते. पावसामुळे काही वेळ का होईना हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे नागरिक सुखावून गेले होते.
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर शेताच्या मशागतीची कामे पूर्ण करून शेतकरी वळीवाच्या पावसाकडे नजर लावून बसले होते. वळिवाचा पाऊस असा शेतीसाठी अत्यंत फायदेशीर असल्याचे मानण्यात येते. आज पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांमधून आनंद व्यक्त होत आहे. दरम्यान, सोसाट्याच्या वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे अनेक लहान मोठी झाडे उन्मळून पडली, काही झाडे विद्युत वाहिनी खांबांवर पडल्याने अनेक वीजेच खांबसुद्धा वाकले गेले आहेत. त्यामुळे सातारा शहरातील काही भागांमधील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे.