चार महिन्यांपूर्वी आत्महत्या केलेल्या युवकाच्या मृत्यूचे गूढ उकललं..

115
Adv

चार महिन्यांपूर्वी आत्महत्या केलेल्या युवकाच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात सायबर सेलला यश आले असून, संबंधित युवकाला फेक अकाउंटवरून मानसिक त्रास दिल्यानेच त्याने आत्महत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी एका युवकाला अटक करण्यात आली आहे. आकाश प्रकाश माने-केंडे (वय २०, रा. शिवाजी नगर, शाहूपुरी सातारा) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.

शाहूपुरीतील शिवाजी नगरमध्ये राहणाºया प्रथमेश माधवदत्त बेंद्रे (वय २०) या युवकाने २४ फेब्रुवारी २०२० रोजी राहत्या घरात बेडरुममध्ये फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मात्र, त्याच्या आत्महत्येचे कारण पुढे आले नव्हते. कोणत्या कारणातून त्याने आत्महत्या केली, याबाबत त्याच्या घरातल्या लोकांनाही माहिती नव्हते. त्यामुळे त्याच्या आत्महत्येपाठीमागचे गूढ अधिक वाढले होते.

सायबर सेलने प्रथमेश बेंद्रे याचे फेसबूक अकाऊंट तपासले असता धक्कादायक माहिती समोर आली. अज्ञाताकडून त्याच्या अकाऊंटवर अश्लील मेसेज पाठविले जात होते. त्याच्या बहीणीचा नंबर मागून त्याला वारंवार त्रास दिला जात होता. तसेच पोलिसात तक्रार देण्याची धमकी त्याला दिली जात होती. त्यामुळेच त्याने आत्महत्या केल्याचे तपासात समोर आले.

संबंधित फेक अकाऊंट ‘सानिका के’ या नावाने सुरू होते. सायबर सेलेने याचा तपास केला असता हे अकाऊंट आकाश केंडे हा चालवत असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. गत चार महिन्यांपासूनचे प्रथमेशच्या आत्महत्येचे गूढ उकलण्याने पोलिसांनीही सुटकेचा निश्वास सोडला. अशा प्रकारे एका फेक अकाऊंटने युवकाचा बळी घेतल्याचे तपासात समोर आले. आकाश केंडे याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक विशाल वायकर, सहा फौजदार शामराव भंडारे, सायबर सेलचे पोलीस नाईक अमित झेंडे, अतिश घाडगे, श्रीनिवास देशमुख, सतीश बाबर यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी परिश्रम घेतले

Adv