माण आणि खटाव तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करा

225
Adv

पावसाळा संपला तरी खटाव आणि माण तालुक्यांमधील बहुतांशी गावांमध्ये सरासरीच्या निम्माही पाऊस झाला नाही. बहुतांश गावांची पैसेवारी ५० पैश्यांपेक्षा कमी असतानाही महा मदत प्रणालीद्वारे करण्यात आलेल्या सदोष सर्वेक्षणामुळे दोन्ही तालुक्यांचा समावेश दुष्काळी तालुक्यात झाला नाही. दुष्काळी निकषांचे फेर सर्वेक्षण करुन खटाव आणि माणला दुष्काळाचा ट्रिगर टू लागू करावा अशी मागणी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यादृष्टीने मंत्रालयीन स्तरावर तात्काळ हालचाली सुरु झाल्या आहेत.

राज्यातील ज्या तालुक्यांमध्ये सरासरीच्या ५० टक्के पेक्षा कमी किंवा अत्यल्प पाऊस झाला आहे, पावसाचा खूप दिवसांचा खंड,पाणी पातळीतील घट, पिक पेरा आणि उत्पादनातील ५० टक्क्यांहून अधिक घट, पिके वाया जाणे, जनावरांच्या चाऱ्याची गंभीर स्थिती, पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्त्रोतांची सध्याची स्थिती या बाबींचा विचार करुन राज्यातील ४२ तालुक्यांमध्ये दुष्काळाचा ट्रिगर टू लागू करण्यात आला आहे. त्यासाठीचे मूल्यांकन आणि सर्वेक्षण महा मदत प्रणालीद्वारे करण्यात आले आहे. लवकरच दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमधील क्षेत्रीय सर्वेक्षण करुन अहवाल तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर दुष्काळासंदर्भात अंतिम कार्यवाही होऊन बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई जाहीर होणार आहे.

खटाव आणि माण हे दुष्काळी तालुके आहेत. दोन्ही तालुक्यात पावसाळ्यात अत्यल्प पर्जन्यवृष्टी झाली आहे. पावसाचा अनेक दिवस खंड पडल्याने खरीप हंगाम वाया गेला आहे. माण तालुक्यात एकूण ११० महसूली गावे आहेत. सर्वच गावांची पिक पैसेवारी ५० पैश्यांपेक्षा कमी आहे. तशीच परिस्थिती खटाव तालुक्यातील १४० पैकी १३६ गावांमध्ये असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिले. दोन्ही तालुक्यातील पर्जन्यवृष्टी अत्यल्प असल्याचेही त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. मतदारसंघातील दोन्ही तालुक्यांचे फेर सर्वेक्षण करुन खटाव आणि माणचा समावेश दुष्काळी तालुक्यांमध्ये करावा अशी मागणीही त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

Adv