लोणंद ते सातारा या राज्यमार्गावरील रस्त्याचे काम लवकरात लवकर व्हावे, यासाठी वडूथचे सामाजिक कार्यकर्ते मदन साबळे तसेच परिसरातील नागरिकांनी 16 ऑगस्ट रोजी ‘रास्ता रोको’ आंदोलन छेडले होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हाधिकार्यांनी स्वतः या रस्त्याची पाहणी करून ताबडतोब कामाला सुरुवातही करण्यात आली होती. मात्र अर्धे काम झाल्यानंतर पुन्हा अवजड वाहतूक सर्रासपणे सुरू झाल्यामुळे हे काम पूर्ण होण्यास विलंब होत आहे. तसेच पुन्हा पुन्हा रस्त्यावरील खडी उखडून पडत आहे. डांबरीकरण केलेल्या जागी पुन्हा डांबरीकरण करावे लागत आहेत.
यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने त्वरित दखल घेणे आवश्यक आहे. अन्यथा या रस्त्याचे काम करून काहीच उपयोग होणार नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाने याची दखल न घेतल्यास पुन्हा ‘आक्रोश आंदोलना’चा पवित्रा वडूथवासियांकडून घेण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते मदन साबळे यांनी दिला आहे.
निरा, लोणंद ते सातारा या मार्गावरील रस्त्याचे काम प्रगतीपथावर असताना या मार्गावरून होत असलेल्या अवजड वाहतूकीमुळे केलेले काम पुन्हा पुन्हा उखडत असून रस्त्यावर खड्डे पडत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने सूचना करूनही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अवजड वाहतूक बंद करण्यासंदर्भात कोणत्याही प्रकारची सूचना वाहनधारकांना मिळाली नसल्यामुळे वाहनधारकांकडून सर्रासपणे वाहतूक केली जात आहे. परिणामी हा रस्ता दुरुस्त होण्याऐवजी पुन्हा पुन्हा खराब होत आहे. आतापर्यंत रस्त्याचे काम सुमारे 50 टक्क्यांपर्यंत झालेले आहे.