सातारा शहराचा विकास हा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा महत्वाकांक्षी अजेंडा आहे . जनतेच्या पैशावर जर कोणी तुंबडी भरणार असेल तर त्याची गय केली जाणार नाही . जर कोणी मलई चापत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करू असा इशारा सातारा विकास आघाडीचे मार्गदर्शक व माजी पक्ष प्रतोद नगरसेवक अॅड दत्ता बनकर यांनी दिला .
सातारा पालिकेतल्या गुडगुडी बाबाचे कारनामे व आरोग्य विभागात सुरू असलेला लक्ष्मी दर्शनाचा छनछनाट याची सातारा नामाने भन्नाट पोल खोल केल्यावर मी मी म्हणणारे सुतासारखे सरळ झाले . कोण किती टक्केवारीत बुडालाय ? याच्या दरपत्रकाची कुंडली सातारा नामाच्या हाताला लागल्यापासून आरोग्य विभाग कोमात गेला . सातारा शहर आणि जिल्हा कोरोना ची निर्वाणीची लढाई लढत असताना आरोग्य विभाग मात्र शेअर ब्रोकर प्रमाणे टक्केवारीची भाषा बोलतोय .
पालिकेत बोकाळलेल्या खाऊगिरीवर सातारा नामाने सातारा विकास आघाडीचे ज्येष्ठ मार्गदर्शक अॅड दत्ता बनकर यांची सडेतोड प्रतिक्रिया घेतली . बनकर पुढे म्हणाले, खासदार उदयनराजे भोसले व सातारा विकास आघाडी कधीच कोणत्या चुकीच्या प्रकारांना पाठीशी घालणार नाही . आम्ही सातारकरांचे विश्वस्त असून त्यांनी विश्वासाने आम्हाला पालिकेची सत्ता सोपवली आहे .जनतेच्या पैशावर कोणी जर स्वतःच्या तुंबड्या भरत असेल तर ते चुकीचे आहे . पदाधिकाऱ्यांना पदे मिळतात तर कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचा पगार मिळतो . कोणी कोणावर उपकार करत नाही . साताऱ्याच्या विकासाच्या आड जर कोणी येउन जर कोणी चुकीचा प्रकार करणार असेल तर तो अजिबात खपवून घेतला जाणार नाही . अशा झारीतल्या शुक्राचार्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे . सातारकरांच्या विकासासाठी अशा कठोर कारवाया करायला आम्ही मागे पुढे बघणार नाही . पालिकेत खासदार उदयनराजे भोसले यांनी आम्हाला कामाची मार्गदर्शक तत्वे घालून दिली आहेत . त्या नियमांचा भंग करणाऱ्या मलई बहाद्दरांना कठोर चाप लावण्याचा इशारा अॅड बनकर यांनी दिला .