सातारा शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या कोटेश्वर मैदानावर मद्यपींचा ओपन बार भरत असून त्याचा त्रास लगतच्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. सर्वत्र लॉकडाऊन असतानाही कोटेश्वर मैदानावर रोज रात्री दारुच्या पार्ट्या रंगत असून मैदानावर दारुच्या बाटल्यांचा खच पडत आहे.
विशेष म्हणजे हे मैदान प्रतिबंधित क्षेत्राला लागून असतानाही असले गैरप्रकार येथे चालतातच कसे? असा प्रश्न निर्माण होत असून पोलिस विभागाने याची गांभिर्याने दखल घेण्याची मागणी होत आहे.
गेल्या दीड महिन्यांपेक्षा जास्त सर्वत्र लॉकडाऊन आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार अनेक उपाययोजना करत आहे. देश, राज्य, जिल्हा संकटात असताना मद्यपींना मात्र त्याचा सोयरसुतक दिसून येत नाही. प्रशासनाला सहकार्य करण्याऐवजी कायदे, नियम तोडायचे कसे याचा प्रत्यय साताऱ्यात वारंवार येत आहे. आपले पोलिसबांधव, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी जीव धोक्यात घालून या संकटाचा सामना करत आहेत. अशा बिकट परिस्थितीत समाजाचे आपणही काही तरी देणे लागतो या भावनेतून प्रत्येकाने सहकार्य करण्याची गरज आहे. मात्र आपण प्रशासनाला किती सहकार्य करतो याचा आपल्यापासून विचार करण्याची आज गरज निर्माण झाली आहे. पोलिस प्रशासन बंदोबस्तात व्यस्त असल्याचा फायदा काही मद्यपींनी घेतल्याचे दिसून येत आहे. त्याचा प्रत्यय शहराच्या मध्यवर्ती असणाऱ्या कोटेश्वर मैदानावर दररोज येत आहे.
कोटेश्वर मैदानाच्या लगत असणारे विद्युत दिवे टिकून दिले जात नाहीत. या परिसरात शाळा, मंदिरे असतानाही त्याकडे दुर्लक्ष करुन मद्यपी याठिकाणी दारुच्या पार्ट्या झोडत आहेत. या परिसरात असणाऱ्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीने मैदानाला संरक्षक भिंत उभारली आहे. याठिकाणी सीसीटीव्ही कॅमरे, विद्युत दिवे बसवण्यात आले आहेत. मात्र याठिकाणी मद्यपींचा वावर वाढल्याने विद्युत दिवे, सीसीटीव्हीचीही तोडफोड करण्यात येत आहे.
सातारा जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी म्हणजे बुधवारपासून दारुची दुकाने खुली झाली. त्याच रात्रीला कोटेश्वर मैदानावर मद्यपींची जंगी पार्टी झाली. या मैदानावर दारुच्या बाटल्यांचा खच पडला होता. रात्री उशिरापर्यंत मद्यपींचा धुडगूस याठिकाणी सुरु होता. विशेष म्हणजे हे मैदान प्रतिबंधित क्षेत्राला लागून असतानाही याठिकाणी मद्यपी एकत्र जमतातच कसे असा प्रश्न निर्माण होत आहे. याबाबत पोलिस प्रशासनाने कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.







