ज्या समाजकंटकांनी ग्रेड सेपरेटर मधील भुयारी मार्गास छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव दिलेला फलक फाडला आहे त्या समाजकंटकांचा पोलीस खात्याने तातडीने शोध घ्यावा आणि त्यांना कडक शासन करावे अन्यथा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घ्यावा लागेल, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब गोसावी यांनी दिला आहे.
साताऱ्यातील ग्रेड सेपरेटर या बहुचर्चित प्रकल्पाचे उद्घाटन भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले. याचा पोटशूळ जर कोणाला उठला असेल आणि छत्रपतींच्या थेट चौदाव्या वंशज यांनी दिलेले छत्रपती संभाजी महाराजांचे नाव या शाहूनगरीत ज्या प्रवृत्तींना आवडले नाही त्यांनी आपली थोबडे पहिली काळी करून द्यावीत. जय छत्रपती शिवरायांच्या भूमीत हा प्रकल्प झाला त्याला संभाजी महाराजांचे नाव घेऊन खऱ्या अर्थाने या प्रकल्पाला वैभव प्राप्त झाले आहे. असे असताना लगेच दुसऱ्या दिवशी ज्या प्रवृत्तींनी हा फलक पाडला या प्रवृत्ती पाकिस्तानातून आलेल्या आहेत काय असा सवालही बाळासाहेब गोसावी यांनी केला आहे.
या घटनेचा मी सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीच्यावतीने जाहीर निषेध करतो. तसेच यासंदर्भात आम्ही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची भेट घेणार असून त्यांनाही निवेदन देणार आहोत. प्रशासनाने तातडीने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून ज्या समाजकंटकांनी हे क्रुत्य केले त्यांना तातडीने अटक करावी, अशी आमची मागणी आहे.
याबाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास जिल्हाभर भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशाराही बाळासाहेब गोसावी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिलेला आहे.