खा श्री छ उदयनराजे यांचा शब्द खरा, अजिंक्यताऱ्यावर पालिकेची सभा संपन्न

205
Adv

सातारा पालिकेच्या इतिहासात प्रथमच पालिकेची विशेष सभा सोमवारी ऐतिहासिक अजिंक्यतारा किल्ल्याच्या राजसदरेवर घेण्यात आली . अजिंक्यतारा किल्यावरील इमारती आणि वास्तूंच्या विकसनाचा ठराव स्वाभिमान दिनानिमित्ताने एकमताने मंजूर करण्यात आला .

ज्या राजसदरेवर ऐतिहासिक निर्णयांची नांदी झाली त्याच अजिंक्यतारा किल्ल्याच्या राजसदरेवर मंगळवारी सातारा पालिकेची विशेष सभा दिमाखात पार पडली. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या किल्ल्याच्या संवर्धनाचा विकास आराखडा तयार करून तो नगरविकास विभागाकडे पाठविण्याचा ठराव पाठवण्यात येईल अशी माहिती सातारा विकास आघाडीचे स्वीकृत नगरसेवक अॅड दत्ता बनकर यांनी देत हा ठराव एकमताने मंजूर करण्याची विनंती केली .

12 जानेवारी दरवर्षी हा दिवस स्वाभिमान दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी सातारा पालिकेची सभा अजिंक्यतारा किल्ल्यावर होईल असे काही दिवसांपूर्वी साताऱ्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी घोषित केले होते त्या प्रमाणे आजच्या दिवशी या दिनाचे औचित्य साधून सातारा पालिकेची प्रथमच अजिंक्यतारा किल्ल्याच्या राजसदरेवर मंगळवारी सकाळी अकरा वाजता विशेष सभा पार पडली.

सर्वप्रथम छत्रपती शाहू महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्यासह सर्व सभापती व नगरसेवकांनी अभिवादन केले. यानंतर सभेला सुरुवात झाली.
सभाअधीक्षक हिमाली कुलकर्णी यांनी अजिंक्यतारा किल्ल्याच्या संवर्धनाचा विषय सभेपुढे मांडला. यावर नगरसेवक ॲड. दत्तात्रय बनकर म्हणाले, सातारा पालिकेने प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार केला. तसाच आराखडा किल्ले अजिंक्यताऱ्याच्या संवर्धनासाठी देखील तयार केला जाईल. या किल्ल्याचे सुशोभीकरण करण्याबरोबरच येथील तळी, मंदिरे, यांचे देखील संवर्धन केले जाईल. हा किल्ला पूर्वी पालिका हद्दीत नसल्याने विकासासाठी अनेक अडचणी येत होत्या. मात्र हद्दवाढीने ही अडचणी आता दूर झाली आहे. त्यामुळे किल्ल्याचा विकास आराखडा तयार करून तो मंजुरीसाठी नगरविकास विभागाकडे सादर केला जाईल. अर्थसंकल्पातही किल्ल्यासाठी विशेष निधीची तरतूद केली जाईल.

नगरसेवक निशांत पाटील म्हणाले, साताऱ्याला अजिंक्यतारा किल्ल्यामुळे ऐतिहासिक महत्त्व लाभले आहे. या किल्ल्याचा विकास व्हावा ही सर्वांचीच भावना आहे. अंतर्गत मतभेद विसरून आपण सर्व नगरसेवक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे किल्ल्याच्या संवर्धनासाठी पाठपुरावा करू. ते नक्कीच किल्ल्यासाठी भरघोस निधीची तरतूद करतील. यानंतर किल्ल्याच्या विकास आराखड्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. यावेळी बांधकाम सभापती सिद्धी पवार, नियोजन सभापती स्नेहा नलवडे, पाणीपुरवठा सभापती सीता हादगे, नगरसेवक किशोर शिंदे, श्रीकांत आंबेकर, राजू भोसले यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Adv