सातारा : प्रतिनिधी
सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार असतानाच सातारा जिल्ह्यात महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम (दादा) यांच्या विजयाचे अभिनंदन करणारे बॅनर झळकल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
वडूज शहरातील प्रमुख ठिकाणी लावण्यात आलेल्या बॅनरवर “भरघोस मतांनी विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन” असा मजकूर ठळकपणे छापण्यात आला आहे. निकाल जाहीर होण्यापूर्वीच विजयाचे फलक लागल्याने कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दिसून येत असल्याची चर्चा सुरू आहे.
विशेष म्हणजे या बॅनरवर “मैत्रीच्या नात्याला बळ देणारा झुंजार नेता” असा उल्लेख करत ग्रामविकासमंत्री जयाभाऊ यांचे छायाचित्रही प्रमुख ठिकाणी झळकविण्यात आले आहे. त्यामुळे या मैत्रीपूर्ण राजकीय समीकरणाचीही चर्चा रंगू लागली आहे.
दरम्यान, सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले असून, निकालापूर्वीच लागलेल्या या अभिनंदनाच्या बॅनरमुळे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. उद्याच्या निकालानंतर हे बॅनर कितपत सार्थ ठरतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.






