Thursday, April 23, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City जनता सहकारी बँकेची 60 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

जनता सहकारी बँकेची 60 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

164
Adv

सातारा शहरासह जिल्हयाची अर्थवाहिनी असलेल्या जनता सहकारी बँकेची 60 वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन अतुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात झाली. या सभेस सर्व संचालक मंडळ सदस्य, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य व सभासद बहुसंख्येने उपस्थित होते. बँकेकडून सर्व ग्राहक व सभासदांसाठी लवकरच आय.एम.पी.एस., क्यूआर कोड, युपीआय यासारख्या ग्राहकाभिमुख व अत्याधुनिक बँकिंग सेवा सुरु करणार असल्याचे चेअरमन अतुल जाधव यांनी जाहीर केले.

शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत 12 मे 22 रोजी सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सभासदांचे प्रत्यक्ष सहभागाव्दारे आयोजित करण्याबाबत आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार बँकेने या सभेचे यशस्वीरित्या आयोजन केले व त्यास बँकेच्या सभासदांकडूनही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. बँकेचे चेअरमन अतुल जाधव यांनी यावर्षी बँकेने आवश्यक त्या सर्व तरतुदी केल्याचे सांगून बँकेच्या स्थैर्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असे बँकेचे भांडवल पर्याप्तता प्रमाण रिझवर्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार कमीत कमी 9 टक्के राखणे आवश्यक असता आपल्या बँकेने हे प्रमाण 15.92 टक्के असे अतिरिक्त राखलेले आहे. सन 2020-21 या आर्थिक वर्षात बँकेने मागील संपूर्ण संचित तोटा कमी करुन 1 लाख 86 हजार इतका निव्वळ नफा मिळवलेला होता. तथापि कोविड-19 विषाणू संसर्गाच्या काळात सर्वसामान्यांच्या नोकरी, व्यवसायावर झालेल्या गंभीर परिणामांची झळ अद्यापही प्रकर्षाने जाणवत असून बँकेच्याही आर्थिक परिस्थितीवर त्याचा विपरित परिणाम झालेला आहे. परंतु बँकेने बँकेच्या प्रशासकीय व दैनंदिन खर्चात काटकसर करुन केलेली कपात, सातत्याने थकीत कर्जवसुली कामी राबविलेले कठोर धोरण या आर्थिक वर्षात देखील प्रभावीपणे राबवून एन.पी.ए. कर्जाच्या प्रमाणावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने वसुली संदर्भातील सर्व प्रकारच्या कठोर उपाययोजना करण्याचे संचालक मंडळाने निश्चित करुन त्याप्रमाणे अंमलबजावणीही सुरु केलेली असल्याने 31 मार्च 22 अखेरील संपूर्ण संचित तोटा या आर्थिक वर्षात भरुन निघेल व बँक पुन्हा एकदा नफ्यात येईल अशी खात्री असल्याचे नमूद करुन बँकेने यापूर्वीही दोन वेळा साडेचार कोटीपेक्षाही जास्त संचित तोटा भरुन काढला असल्याचे सांगितले. बँकेकडून सर्व ग्राहक व सभासदांसाठी लवकरच आय.एम.पी.एस., क्यूआर कोड, युपीआय यासारख्या ग्राहकाभिमुख व अत्याधुनिक बँकिंग सेवा सुरु करणार असल्याचे चेअरमन अतुल जाधव यांनी जाहीर केले.

याप्रसंगी बँकेचे भागधारक पॅनेलप्रमुख, संचालक व बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन विनोद कुलकर्णी यांनी बँकेच्या सर्व शाखांमधील ग्राहकांना एन.ई.एफ.टी, आर.टी.जी.एस. चे व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध असून यापूर्वी बँकेच्या फक्त सातारा शहर शाखेतून देण्यात येत असलेली सीटीएस क्लिअरिंग सुविधा ही सर्व 16 शाखेतील ग्राहकांसाठी प्रत्येक शाखेतून देण्यात येत असल्याचे नमूद करुन बँकेने नुकतेच नवीन व अद्यावत संगणक प्रणालीव्दारे बँकेचे सर्व संगणकीय कामकाज यशस्वीरित्या सुरु केले असून बँकेकडून सर्व ग्राहक व सभासदांसाठी लवकरच आय.एम.पी.एस., क्यूआर कोड, यु.पी.आय. यासारख्या ग्राहकाभिमुख व अत्याधुनिक बँकिंग सेवा सुरु केल्या जाणार असून त्याचा लाभ घ्यावा. बँकेने समाजातील सर्व वर्गामधील सभासदांना विविध कर्ज योजनांव्दारे सुलभ कर्जपुरवठा केलेला असून यापुढील काळातही सभासदांनी बँकेच्या अल्प व्याजदराच्या विविध कर्ज योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

बँकेचे ज्येष्ठ संचालक जयेंद्र चव्हाण यांनी प्रास्ताविक केले व सभेपुढील सर्व विषयांचे वाचन केले. त्यास बहुसंख्य सभासदांकडून मंजुरी देण्यात आली. बँकेचे सभासद वसंतराव माळी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सेवानिवृत्त कर्मचारी पेन्शन संघटनाप्रमुखांनी बँकेकडील विनातारण कर्ज मर्यादेत वाढ करण्याबाबत संचालक मंडळ सदस्यांकडे मागणी केली त्यास श्री.चव्हाण यांनी याबाबत रिझवर्ह बँक ऑफ इंडिया यांच्या कार्यालयाकडे योग्य तो पाठपुरावा सुरु असल्याचे नमूद करुन श्री.माळी यांच्या सूचनेची नोंद घेतली. वार्षिक सभेतील उपस्थित सभासदांचे बँकेचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब गोसावी यांनी बँकेच्यावतीने आभार मानले. सभेपूर्वी अहवालसालात दिवंगत झालेले भारतातील सन्मानीय नागरिक, शहीद जवान, बँकेचे सभासद, खातेदार, पदाधिकारी, कर्मचारी व त्यांचे नातेवाईक यांना संचालक मंडळाने श्रध्दांजली अर्पण केली. सदर सभेमध्ये संचालक श्री. जयवंतराव भोसले, श्री. आनंदराव कणसे, श्री.माधव सारडा, डॉ. चेतना माजगावकर, श्री.अशोक मोने, श्री.अमोल मोहिते, श्री. वजीर नदाफ, श्री.चंद्रशेखर घोडके (सराफ), श्री. विजय बडेकर, सौ. सुजाता राजेमहाडिक, श्री.अविनाश बाचल, प्रा.श्री.अरुणकुमार यादव, श्री. निशांत पाटील, श्री.रविंद्र माने, श्री.वसंतराव लेवे, श्री.नारायण लोहार, श्री.रामचंद्र साठे, तज्ञ संचालक श्री. धीरज कासट, श्री. ओंकार पोतदार, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य श्री. विनय नागर, श्री. केतन जगदाळे, अॅड. श्री.चंद्रकांत बेबले, सेवक संचालक श्री.हमीद शेख, श्री.युवराज काळे, स्वीकृत संचालक सदस्य श्री. अजित साळुंखे यांनी सहभाग घेतला.

बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत शास्त्री, प्रशासन अधिकारी अनिल जठार, मुख्य कार्यालयातील सर्व विभागप्रमुख तसेच बँकेतील सर्व अधिकारी व सेवक वर्ग यांनी सभेच्या ठिकाणी उपस्थित राहून सभेचे यशस्वीरित्या आयोजन केले.

Adv