सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. त्यातच मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येनं ७५ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे अनेक गणेशोत्सव मंडळांनी गणपतीच्या मोठ्या मूर्ती न आणण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय आगमन, पाद्यपूजन सोहळेदेखील रद्द केले आहेत. यानंतर आता मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं यंदा उत्सव साजरा न करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता गणेशोत्सव साजरा न करण्याचा महत्त्वाचा निर्णय मंडळानं घेतला आहे. त्याऐवजी मंडळाकडून आरोग्यसेवेच्या दृष्टीनं महत्त्वाचे उपक्रम हाती घेण्यात येणार आहे.
त्यामध्ये रक्तदान आणि प्लाज्मादानचा समावेश आहे. यासाठी मंडळाकडून कॅम्पचं आयोजन करण्यात येणार आहे. मंडळानं घेतलेल्या या निर्णयाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.