उत्तर कोरेगाव तालुक्यातील मोठी बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या वाठार स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी तसेच जीवघेण्या वळणांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे येथील पर्यायी मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांचा जीव टांगणीला लागलेला आहे.
सविस्तर माहिती अशी की, वाठार स्टेशन येथे काही दिवसांपूर्वी मुख्य रस्त्यावरील एकाच कुटुंबातील सहा सदस्य कोरोनाग्रस्त आढळून आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने येथील मुख्य रस्ता बॅरिकेटच्या साहाय्याने सील केलेला आहे त्यामुळे येथील पर्यायी मार्गाचा वापर म्हणून रेल्वे पुलाशेजारून थेट विखले फाटा येथे असा केलेला आहे परंतु हा पर्यायी मार्गच आता मोठ्या प्रमाणावर अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. या पर्यायी मार्गावरून जात असताना वाहनधारकांना रेल्वे पुलाशेजारी असणाऱ्या धोकादायक वळणाला सामोरे जावे लागत आहे त्याचप्रमाणे हा रस्ता थेट महामार्गाला मिळत असल्याने येथेही या पर्यायी मार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांना अपघाताला सामोरे जावे लागणार आहे तसेच या पर्यायी मार्गावर खड्ड्यांचेही साम्राज्य बनलेले आहे त्यामुळे वाहन धारकांना या मार्गावरून जात असताना तारेवरची कसरत आणि मुठीत जीव धरून जावे लागत आहे. यामुळे प्रशासनाने एकदा मोठा अपघात होण्याची वाट न पाहता येथील मुख्य रस्ता लवकरात लवकर सुरू करून होणारी घटना टाळावी ही उत्तर कोरेगाव तालुक्यातील नागरिकांची मागणी जोर धरू लागली आहे.