वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील भातशेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर करणा होते मात्र नियोजित दौरा रद्द करून ते पाचगणी व महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी पोहोचले त्यांच्या स्वागतासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या दुरुस्तीसाठी केलेला लाखो रुपयांचा खर्च अक्षरशः पाण्यात गेला. विरोधी पक्षनेते प्रवीणजी दरेकर यांच्या या रद्द केलेल्या दौऱ्यामुळे वाई तालुक्यातील शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांच्या दुःखावर फुंकर घालून त्यांच्या नुकसानीची पाहणी करायला येणाऱ्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दरेकर यांच्या दौऱ्याची वाई तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी गेल्या काही दिवसांपासून जोरदार तयारी केली होती. विरोधी पक्षाचा धडाकेबाज नेता येणार असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागही कामाला लागला. वर्षानुवर्षे रखडलेल्या पश्चिम भागातील रस्त्यावर लाखो रुपये खर्ची पडले परंतु विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दरेकर यांनी नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांकडे पाठ फिरवली.
थंड हवेच्या जाऊन विरोधी पक्षनेत्यांनी आपली एक प्रकारे चेष्टा केल्याची बळीराजाची भावना झाली आहे वास्तविक विरोधी पक्षनेत्यांच्या दौऱ्यामुळे सत्ताधारी तात्काळ नुकसानभरपाई देतील, अशी भाबडी आशा होती; परंतु भाजप नेत्याच्या हुलकावणीमुळे ही आशा हवेत विरून गेल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. पश्चिम भागातील हजारो हेक्टर भातशेती जमीनदोस्त झाली आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी वाई तालुक्याचा दौरा रद्द करून वाईतील विश्रामगृहावर शासकीय अधिकाऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेतली. त्यावेळी नुकसानग्रस्त भागातील एकही शेतकरी उपस्थित नव्हता. त्यामुळे तेथे नक्की काय चर्चा झाली, याची पुसटशीही कल्पना नसल्याने मदत कधी मिळणार याची चिंता आता वाई तालुक्यातील बळीराजाला सतावत आहे.