सातारा : आगामी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मंत्री मकरंद पाटील, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि आमदार धैर्यशील कदम यांची महत्त्वपूर्ण बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने झालेल्या या बैठकीत आगामी निवडणुकीतील राजकीय समीकरणे, जागावाटप आणि महायुतीतील समन्वय याबाबत चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना महायुतीच्या घटकांमध्ये एकत्रितपणे निवडणूक लढविण्याच्या शक्यतेला या बैठकीमुळे अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
मात्र, महायुती म्हणून निवडणूक लढविण्याचा अंतिम निर्णय झाला आहे का, याबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. त्यामुळे बैठकीतील चर्चेचे नेमके स्वरूप आणि पुढील राजकीय दिशा याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक ही केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित न राहता जिल्ह्यातील राजकीय शक्तिसंतुलनासाठीही महत्त्वाची मानली जात असल्याने या बैठकीकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.






