Monday, September 28, 2026
spot_img
Home Satara District Mahabaleshwar खिंगर सोसायटी प्रकरण आता सहकार विभागाच्या रडारवर!

खिंगर सोसायटी प्रकरण आता सहकार विभागाच्या रडारवर!

47
Adv

महाबळेश्वर तालुक्यातील खिंगर विकास सेवा सोसायटीमध्ये राजेंद्र निवृत्ती राजपुरे यांना सभासद केल्याच्या नोंदीवरून वाद निर्माण झाला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. संस्थेचे व्हाईस चेअरमन धर्मा चोखू मोरे यांनी ९ सप्टेंबर २०२६ रोजी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने ही कार्यवाही करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, राजेंद्र निवृत्ती राजपुरे हे संस्थेच्या कार्यक्षेत्रातील रहिवासी नसतानाही त्यांना सन २०२३ मध्ये संस्थेचे सभासद केल्याचे रेकॉर्ड तयार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्यांचा सभासदत्वाचा अर्ज संचालक मंडळाच्या बैठकीसमोर आला नसल्याचा आणि सभासदत्व मंजुरीचा विषय अजेंडा नोटीसमध्येही नसल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणात संस्थेचे चेअरमन महादेव बापू दुधाने, सचिव युवराज धोंडिबा दुधाने तसेच प्रमाणित लेखापरीक्षक धिरज विठ्ठल साळुंखे आणि गणेश भीमराव पोफळे यांनी संस्थेच्या रेकॉर्डमध्ये अनधिकृत बदल केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. संस्थेचा कारभार संचालक मंडळाला विश्वासात न घेता चालविला जात असल्याचाही आक्षेप नोंदविण्यात आला आहे.
तक्रारीतील मुद्दे क्रमांक १ ते ६ बाबत सखोल चौकशी करण्यासाठी चौकशी अधिकारी नियुक्त करण्यात आला असून, संबंधित कागदपत्रांची तपासणी करून आवश्यक अहवाल जिल्हा उपनिबंधक कार्यालयास सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे सभासदत्वाची नोंद नेमकी कशाच्या आधारे करण्यात आली, संचालक मंडळाची मंजुरी होती का, तसेच संस्थेच्या रेकॉर्डमध्ये काही अनधिकृत फेरफार झाला आहे का, याबाबत चौकशीतून स्पष्टता येणार आहे.
या चौकशीच्या निष्कर्षाकडे खिंगर परिसरासह सहकार क्षेत्राचे लक्ष लागले असून, चौकशीत आरोप तथ्यात्मक ठरल्यास संबंधितांवर कोणती कारवाई होते, याकडेही आता लक्ष लागले आहे.

Adv