(अजित जगताप)
पाचगणी दि. २१ : महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी ( मौजे गोडवली) येथे साडे अठरा एकर जमिनीची खरेदी केलेल्या महात्मा फुले मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण सोसायटीच्या ३९८ सभासदांचे घराचे स्वप्न त्या सोसायटीच्या काही पदाधिकाऱ्यांमुळे धुळीला मिळण्याच्या मार्गावर आहे. हे प्रकरण सव्वा कोटी रुपयांच्या अपहाराचे असून मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दि: १६ जून २०२३ रोजी तपासासाठी सातारा जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे वर्ग केले आहे. मात्र गेले चार महिने हे प्रकरण सातारा पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली जैसे थे असल्याचे दिसून आले आहे. यामुळे मागासवर्गीय लाभार्थ्यांना लाभ मिळू दिला जात नाही. घर देता का घर म्हणण्याची पाळी आली आहे.
थंड हवेच ठिकाण असलेल्या सातारा जिल्ह्यातील पाचगणी येथील महात्मा फुले मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण
सोसायटीने ३४ वर्षापूर्वी म्हणजे १९८९ सालात सर्व आवश्यक कागदपत्र सादर करून खरेदी केलेला भूखंड घेतला . हा भूखंड बिनशेती (एन. ए) करून घेण्यासाठी सातारा जिल्ह्यातील महसूल अधिकारी- कर्मचाऱ्यांना रक्कम देण्याच्या नावाखाली पदाधिकाऱ्यांनी तब्बल सव्वा कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप काही सभासदांनी केला आहे. वास्तविक या कामासाठीच गोळा करण्यात आलेला निधी सोसायटीच्या काही पदाधिकाऱ्यांनी बँकेतून २०१३ सालातच काढला होता . पण, महात्मा फुले मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण सोसायटीचा भूखंड बिनशेती करण्याचे काम गेल्या १० वर्षांत मार्गी लागू शकलेले नाही. या मध्ये आर्थिक अपहाराच्या प्रकरणात सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पाचगणी शाखाही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्याची ही सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
या प्रकरणात महात्मा फुले सोसायटीचे माजी सचिव के. एल. कदम आणि इतर सभासदांनी जून महिन्यात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या सह पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली होती. गृहनिर्माण सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी अपहार केलेली सव्वा कोटी रुपयांची रक्कम ही ३९८ सभासदांनी २५ हजारांपासून ५० हजारापर्यंत अनामत रक्कम म्हणून दिलेली आहे, असे तक्रारीत स्पष्ट नमूद केलेले आहे.
पाचगणी येथील महात्मा फुले मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थेची स्थापना १९८४ साली केली होती. साडे अठरा एकराच्या भूखंडाची खरेदी १९८९ सालात चीफ प्रमोटर दिवंगत पांडुरंग शिंदे, दिवंगत भीमराव कांबळे, किसन घाडगे यांनी मेसर्स बिलीमोरिया ट्रस्ट यांच्याकडून रितसर घेतली होती. त्यातील शिंदे यांचे १९९२ सालात निधन झाले. त्यानंतर भीमराव कांबळे यांची चीफ प्रमोटर म्हणून तर के. एल. कदम यांची सचिवपदी निवड करण्यात आली होती. पण २००२ सालात भीमराव कांबळे यांचेही निधन झाले आहे.
दिवंगत चीफ प्रमोटर पांडुरंग शिंदे यांचा मुलगा रमेश शिंदे यांनी पाचगणीतील काही सभासदांची जमवाजमव केली. त्याआधारे महात्मा फुले मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्था स्वतःच्या नेतृत्वाखाली २०१० सालात रजिस्टर्ड करून घेतली. तेव्हापासून अध्यक्षपदी रमेश शिंदे हे असून आनंद कांबळे हे सचिव तर विजयकुमार अहिवळे हे कोषाध्यक्ष आहेत.
*युती सरकारची संस्थेला मदत*
—————–
१९८९ मध्ये फुले गृहनिर्माण सोसायटीने खरेदी केलेल्या साडे अठरा एकरांपैकी साडे बारा एकरावर १९९१-९२ मध्ये आय टी आय तंत्रशिक्षण संस्थेसाठी आरक्षण टाकण्यात आले होते. तर,सहा एकरावर नगर परिषदेच्या ग्रीन झोनचे आरक्षण टाकले होते. त्यामुळे अख्खा भूखंड गमावण्याची वेळ आमच्या सोसायटीवर आली होती. पण ३९८ सभासदांनी त्यावेळी राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर शिवसेना – भाजप युतीचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी आम्हाला बोलावून घेत आठ एकराचा भूखंड संस्थेला परत केला होता, अशी माहिती महात्मा फुले मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थेचे माजी सचिव के. एल. कदम आणि सभासद उदय खरात यांनी दिली आहे. आरक्षण उठवल्यानंतर भूखंडाचा ताबा मिळायला २००२ साल उजाडले होते. त्यामुळे संस्थेचे रजिस्ट्रेशनही रखडले होते, असे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणाची चौकशी करून मागासवर्गीय लाभार्थ्यांना त्यांचा यथोचित सन्मान करून त्यांना त्यांची जागा मिळतील असे प्रयत्न करावेत अशी मागणी काही सभासदांनी केली आहे.