आरक्षण मिळेल, पण अगोदर नोकर्‍या वाचवा!

488
Adv

(अजित जगताप)
सातारा : देशामध्ये निवडणुका जवळ आल्या, की जातीनिहाय आरक्षण मागण्याचे पेव फुटते, आंदोलने केली जातात. परंतू आतापर्यंत पावणे दोन लाख शासकीय नोकर भरती होवू शकलेली नाही. कंत्राटीकरण सुरु झाले आहे. मग आपण कोणासाठी आरक्षण मागत आहे? जातीनिहाय आरक्षण मिळेल, पण अगोदर नोकर्‍या वाचवा, असे प्रतिपादन श्रमिक कामगार आघाडीचे नेते व सातारा जिल्ह्याचे सुपूत्र यशवंतभाऊ भोसले यांनी सातारा येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकारांच्या चर्चेमध्ये केले.
सातारा जिल्ह्याचे भाजपचे प्रभारी माजी खासदार अमर साबळे यांच्यासमवेत यशवंतभाऊ भोसले हे सातारला आले होते. त्यावेळी त्यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच साबळे आणि खा. उदयनराजे यांचे कट्टर समर्थक सुनील काटकर यांचा सत्कार करुन त्यांनी शुभेच्छाही दिल्या.
यावेळेस राजेंद्र घाडगे, उद्धव घाडगे, धनसिंग घाडगे, संतोष घाडगे, विलास सावंत, नलवडेदादा, अशोक येवले, तानाजी गोळे, सदाशिव माने, नवनाथ घाडगे यांच्यासह सातारा जिल्ह्यातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेली 30 वर्षे श्रमिक कामगार आघाडी चळवळ चालवित आहेत. यामध्ये अनेक स्थित्यंतरे घडून गेली आहेत. शासकीय सेवेत स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून नोकर्‍या लागत होत्या. आता एजन्सीज नेमूण नोकर्‍या दिल्या जात आहेत. पाच वर्षाचे कंत्राट झाल्यावर यापुढे लाखो तरुणांचे भवितव्य काय? यासाठी कोणताही राजकीय पक्ष स्पष्ट भूमिका घेताना दिसत नाही. यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे. पगाराची पावती ज्याला मिळते, तो कामगार, असे सुटसुटीत गणित आहे. पगाराची हमी असल्यामुळे बँका व पतसंस्था संबंधितास नवीन घर, गाडी, फ्रिज साठी कर्ज देते. जर पगाराची पावतीच नसेल तर कोणीच कर्ज देणार नाही. त्यामुळे बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल ढासळणार आहे. कामगार व शेतकरी हा मोठा ग्राहक असून त्याला पुरेसे वेतन जर मिळाले नाही, तर तो वस्तू खरेदी करणार नाही, बाजारपेठेत त्याची पत राहणार नाही.
आयएएस ते पत्रकार जर कंत्राटी पद्धतीने काम करु लागले, तर त्याचे नुकसान होणार आहे. आम्ही भारतीय जनता पक्षाचे असलो तरी देशहिताला प्राधान्य देत असतो. बाजारपेठेत जर खरेदी होत नसेल, तर आर्थिक उलाढाल ठप्प होणार आहे, वस्तू उत्पादन करणारे कारखाने बंद पडतील. त्याअनुषंगाने देशाची आर्थिक व्यवस्थाही ढासळणार आहे.
आमदार, खासदारही खाजगी आहेत. पाच वर्षांनी ते बदलतात. शिक्षण हा पाया आहे. याठिकाणीही सेवानिवृत्त शिक्षकाची नियुक्ती केली जाते. पन्नास हजारांपेक्षा पाच हजारामध्ये जर कोणी काम करीत असेल, तर निवडणुकीतही त्याची किंमत कमी होणार आहे. दारु, मटण आणि दोन हजार रुपये, हा कार्यक्रम पंधरा दिवसच होतो. ही घाणेरडी सवय आहे. जर तरुणाला स्वाभिमानाने जगायचे असेल तर नेत्याला जाब विचारला पाहिजे. आज प्रत्येक नेत्याचे पोलिंग एजंट असून ते आयुष्यभर पोलिंग एजंटचेच काम करतात. त्यांनासुद्धा पर्मनंट नोकरी नाही, याबाबतही त्यांनी भाष्य केले.
देश म्हणजे ताजमहाल, अजिंक्यतारा, मेट्रो नव्हे तर सर्वसामान्य माणूस म्हणजे देश आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिप्रेत असणारा देश, तो जर सुखी नसेल व वाईट अवस्थेत राहत असेल तर योग्य नाही.
विधीमंडळाच्या अधिवेशनात महत्त्वाचे विषय बाजूला ठेवून, ठरवून विषय मांडले जातात. कंत्राटी पद्धतीवर कोणी बोलत नाही, सर्व शांत राहतात. सर्वांना उद्योगपती सप्लायर आहेत. सातारा जिल्ह्यात औद्योगिकीकरण वाढले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, सातार्‍यात चांगले प्रोजेक्ट येणे गरजेचे आहे. ज्या-ज्या ठिकाणी मी जातो, ती सर्व शहरे औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. मात्र, सातार्‍यात मोठे उद्योग येणे गरजेचे आहे, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

Adv