सातारा : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळा प्रवेश घेतलेल्या साताऱ्यातील प्रतापसिंह हायस्कूलच्या दुरुस्तीसाठी सात कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती राजेश यांनी दिली.
७ नोव्हेंबर १९०० मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी साताऱ्यातील प्रतापसिह हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला होता. राज्य शासनाच्यावतीने हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याप्रमाणे विद्यार्थी दिन कार्यक्रमाचे आयोजन प्रतापसिंह हायस्कूल, सातारा येथे करण्यात आले होते. त्यावेळी पवार बोलत होते.
दरम्यान, यंदाच्या वर्षी लोकप्रतिनिधी व प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत ही कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. त्याबाबत बोलताना माजी पंचायत समिती सदस्य प्रवीण धस्के म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी साताऱ्यातील शाळेत प्रवेश केला, ही अभिमानाची बाब आहे. आज देशभरातून नागरिक व विद्यार्थी शाळेला भेट देत आहेत. वीस वर्षांपूर्वी ए.के. गायकवाड, प्रा.विलास वहागावकर, वामनराव मस्के, दत्तात्रय पवार, मनोहर पवार, रमेश इंजे, दिनकर झिब्रे, गौतम भोसले, गोरख बनसोडे आदी.आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यानी शाळा प्रवेश दिन सोहळ्याचे रोपटं लावले.आज त्याचा वटवृक्ष बनत आहे. संपूर्ण राज्यातील प्राथमिक शाळेत शाळा प्रवेश दिन साजरा करण्याचा शासनाने आदेश पारित केला आहे. पण, सत्तेच्या शाळेत प्रवेश करण्याची इच्छा असलेल्या राजकारणी मंडळींना तसेच काही प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्याचा विसर पडला आहे, अशी खंत प्रवीण धस्के यांनी व्यक्त केली.
यावेळी शाळा प्रवेशदिनाच्या निमित्ताने शालेय विद्यार्थी यांना गणवेश तसेच खाऊ वाटप करण्यात आले. शाळेला भेट देण्यासाठी विद्यार्थी, पालक व आंबेडकर अनुयायी जमले होते.त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नोंदणी पुस्तक पाहिले व शाळेच्या आवारात झालेली सुधारणा पाहून समाधान मानले. कार्यक्रमास कृषी सभापती मनोज पवार, समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वंगोड, शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, उप मुख्यकार्यकारी अधिकारी श्रीमती पाटील, संदीपभाऊ शिंदे, पत्रकार अजित जगताप, मनोजकुमार तपासे,राजस्थानचे अजय जयपाल, मुख्यध्यापक सन्मती देशमाने व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक सन्मती देशमाने, उत्तम साळुंखे, निखिल चौगुले यांनी केले तर आभार गायत्री पवार यांनी मानले.