शाळेच्या बोलक्या भिंती झाल्या अबोल

74
Adv

पिंपोडे बुद्रुक प्रतिनिधी
हुबेहूब रेखाटलेल्या स्वतंत्र लढ्यातील एखाद्या चिञातून इतिहासाचे वर्णन करणाऱ्या, नकाशाच्या माध्यमातून संपूर्ण जगाची भ्रमंती घडवतानाच अकड्यांच्या मदतीने गणिताची उजळणी घेणाऱ्या, हे कराच;परंतु हे करू नका असा मोलाचा सल्ला देत आपल्यातील मुलांसंबंधी असलेलं नात अधिक घट्ट करणाऱ्या शाळेतील बोलक्या भिंती आता जणू अबोल झाल्या आहेत. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे गावागावातील शाळा गेले काही महिने बंद असल्याने शाळेतील किलबिल बंद झाली आहे. मुलांच्या एकसुरातील आवाजाने दुमदुमून जाणारा शाळेचा परिसर अबोल झाला आहे.
जून महिना सुरू झाला कि मुलांना शाळेची चाहूल लागते. शाळा सुरू होताच मुले, शिक्षक व शाळा यांचे नाते अधिक घट्ट होत असते.शाळा, शिक्षक यांच्या प्रबोधनातून संस्कारातून मुलांचे व्यक्तिमत्त्व घडत असते यामध्ये विविध विषयांच्या माहितीने सजविलेल्या शाळेच्या भिंतींचे योगदान देखिल तितकेच महत्त्वाचे असते. शाळेच्या भिंतीवरील इतिहासातील घडामोडींचे चित्ररुपी वर्णन,नकाशातून सूचित केलेली राज्य, देश, जगातील लोकजीवन व इतर माहिती, व्यवहारात आकडेमोड करताना उपयोगी पडणारे पाढे,व इतर गणितीय माहिती, तर हे करा, ते करू नका असा सल्ला देणारे संदेश या बाबी जीवनभरासाठी ज्ञानाची शिदोरी देत असतात. म्हणूनच या शाळेच्या भिंती प्रत्येक विद्यार्थ्याला बोलक्या वाटतात. सद्यस्थितीत उद्भवलेल्या कोरोना विषाणू संसर्गामुळे शाळा बंद आहेत.त्यामुळे शाळेत असताना विद्यार्थ्यांशी घट्ट मैत्री जमणाऱ्या शाळेच्या बोलक्या भिंती अबोल झाल्या आहेत.
दरम्यान केरोना विषाणू संसर्ग परिस्थितीमुळे बहुतांशी शाळांनी घरबसल्या ऑनलाईन क्लासला सुरवात केली आहे. परंतु प्रत्यक्ष शाळेत होणारे ज्ञानार्जन व मोबाईलच्या माध्यमातून होणारे ऑनलाईन क्लास याच्या तुलनात्मक आकलनातून शाळा परिसरातच शिक्षणासाठी निर्माण होणारे वातावरण तेथिल परिसर व इतर घटक विद्यार्थ्यांसाठी अधिक पूरक ठरत असतात.
———————————————–अध्ययन सार्थ व सुस्पष्ट करण्यासाठी चिञे व साधनांची मदत होते.सचिञ कथेतील अधिक तपशील दीर्घतर कालावधीपर्यंत मुलांच्या ध्यानात राहतो. अध्यापनात चिञांचा वा फलकांचा उपयोग केल्यास विषयबोध चांगला होतो. त्यामुळेच शाळेच्या भिंतीवरील चिञ मुलांना अधिक बोलकी वाटतात
-मुस्कान आतार
अध्यक्ष कोरेगाव तालुका महिला शिक्षक समिती.
———————————————-
दरम्यान सद्यस्थितीत उद्भवलेल्या कोरोना विषाणू संसर्ग काळात विलिगिकरण कक्ष म्हणून गावागावातील शाळांचा वापर करण्यात येत आहे.कित्येक वर्षापूर्वी ज्या शाळेतून शिक्षण घेऊन बाहेर पडलेली मंडळी साथीच्या रोगाच्या परिस्थितीमुळे पुन्हा एकदा शाळेच्या सहवासात आली.त्यामुळे लोकांमध्ये शाळांविषयी आस्था निर्माण होऊन बहुतांशी ठिकाणी लोकसहभागातून शाळांच्या नूतनीकरणाच्या कामांना सुरूवात झाली आहे.

Adv