समाजाच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या महिलेला सावित्रीबाई फुले  – ग्रामविकास मंत्री छगन भुजबळ

148
Adv

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्म गाव नायगाव हे ऊर्जा स्त्रोत आहे. या गावाला नागरिक भेट देऊन ऊर्जा घेऊन जातात. या गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल. तसेच क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी समाजामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलेचा 1 लाख रुपये देऊन सत्कार करावा म्हणजे इतर महिलांनाही प्रोत्साहन मिळेल, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री छगन भुजबळ यांनी आज केले.
सुरुवातीला नायगाव ता. खंडाळा येथील क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास श्री. भुजबळ यांनी अभिवादन करुन पुरातत्व विभागाने सावित्रीबाईंच्या जीवनावर आधारित उभारलेल्या स्मारक व चित्रशिल्पाची पहाणी केली. त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती खंडाळा व ग्रामपंचायत नायगाव यांनी आयोजित केलेला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती सोहळा श्री. भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी स्मारकास भेट देऊन अभिवादन केले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, आमदार मकरंद पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, माजी मंत्री, राम शिंदे, माजी मंत्री, शशिकांत शिंदे, प्रांताधिकारी संगिता चौगुले, तहसीलदार दशरथ काळे, जिल्हा परिषेचे उपाध्यक्ष प्रदिप विधाते, खंडाळा पंचायत समितीचे सभापती राजेंद्र तांबे, नायगावचे सरपंच सुधीर नेवसे,  प्रा. हरी नरके आदी उपस्थित होते.
शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची कार्यवाही सुरु केली आहे या योजनेंतर्गत शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. योजनेपासून एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही, असे सांगून श्री. भुजबळ पुढे म्हणाले, फुले दांपात्यानी समाज परिवर्तनाचे मोठे काम केले आहे यामुळेच आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांबरोबर काम करीत आहे. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले  अखेरच्या श्वासापर्यंत लोकांसाठी काम करीत राहिल्या. त्यांच्या विचारांवर एक पाऊल जरी चाललो तरी समाजातील अनेक प्रश्न मार्गी लागतील.
फुले दांपत्यांचे विचार समाजामध्ये पाहण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. त्यांचे विचार प्रत्येकाने अंगीकारले पाहिजे. लोकप्रतिनिधींनी नायगाव मध्ये मुलींसाठी अभियांत्रिकी महाविद्यालय व्हावे अशी मागणी केली आहे यासाठी शासन पातळीवर प्रयत्न केले जातील. कौशल्य विकास व समुपदेशन केंद्राचे काम मार्गी लावण्याबरोबरच क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांचे जन्म गावाच्या विकासासाठी शासन कटीबद्ध असल्याचेही ग्रामविकास मंत्री श्री. भुजबळ यांनी शेवटी सांगितले.
 क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आज सर्व क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. नायगावच्या विकासासाठी शासनाने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन द्यावा. तसेच नायगाव येथे मुलींसाठी अभियांत्रिकी महाविद्यालय व्हावे, अशी अपेक्षा जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांनी कार्यक्रमात व्यक्त केली.
क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचून समाजाचा विरोध असतानांही  समाज परिवर्तनाचे बीजे रोवली. चौफेर दृष्टी ठेवून समाज परिवर्तनाचे काम केले. त्यांनी अनेक क्षेत्रात काम केले. समाजातील अनिष्ठ रुढी बदलण्याचे त्यांनी काम केले. आज स्त्रीया प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत त्या फक्त क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांच्यामुळे. त्यांच्या जन्म गाव नायगाच्या विकासासाठी मंत्रालयात स्वतंत्र बैठक घ्यावी. त्यांच्या नावाला शोभेल असे, नायागावचा विकासासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार मकरंद पाटील यांनी केले.

Adv