रस्त्यांच्या गैरसोईमुळे ऊस- तोडणीचा खोळंबा

47
Adv

– पिंपोडे बुद्रुक –प्रतिनिधी परिसरात चालू वर्षी झालेल्या ऐनवेळीच्या मुसळधार पावसाने यंदाचा गळीत हंगाम उशीरा सुरु झाला असून पाऊस व अन्य कारणांनी परिसरात निर्माण झालेल्या रस्त्यांच्या गैरसोयीमुळे कारखान्याच्या शिवारात हंगाम सुरु होऊन देखिल ऊस तोडणीचा खोळंबा होत असल्याचे चित्र आहे.

जुलै – ऑगस्टच्या सुमारास झालेली अतिवृष्टी व त्यानंतर परिसरात अधून – मधून होणाऱ्या ऐनवेळीच्या पावसामुळे परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. परिसरात अजूनही काही शेतात पावसामुळे झालेली दलदल तशीच आहे चालू वर्ष झालेल्या बेसुमार पावसामुळे कारखान्यांनी गळीत हंगाम उशीरा सुरु केला आहे. परंतु परिसरात आजही पावसाची दलदल असून बहुतांशी ठिकाणी पावसामुळे शिवार रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे परिसरात ऊस तोडणीनंतर त्याच्या वाहतूकीसाठी रस्त्यांची अडचण निर्माण झाली असल्याने ऊस तोडणीचा खोळंबा होत आहे. तसेच रब्बी हंगामाच्या पेरणीपूर्व काळात परिसरात झालेल्या ऐनवेळच्या जोरदार पावसामुळे रब्बी हंगामातील पेरणी उशीरा झाली त्यामुळे रस्त्याच्या दृष्टीने अडचणीत असलेल्या ऊस बागायतदार शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पीकांची काढणी होईपर्यंत ऊस तोडणीसाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.
दरम्यान सद्यस्थितीत निर्माण होणाऱ्या ढगाळ हवामानासह पाऊस सदृश्य परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिक भर पडली आहे. त्यामुळे परिसरातील पांदण रस्यांची कामे त्वरित मार्गी लावावीत अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे.

चौकट :- पांदण रस्त्यांच्या कामाला लवकरच सुरुवात

परिसरातील पांदण रस्त्यांची सद्यस्थिती लक्षात घेऊन त्यासठी जिल्हा परिषद व इतर फंडातून रकमेची तरतूद केली असून अल्पावधीतच रस्त्यांच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल. मंगेश धुमाळ,जि.प.सदस्य .

चौकट :- दरम्यान केवळ रस्त्यांच्या गैरसोईमुळे शेतीचे मोठे नुकसान होत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी समजूतदार पणे विचार करुन शक्य त्या ठिकाणी रस्ते उभारणीसाठी लोकसहभागातून पुढाकार घेण्याची गरज आहे.
प्रविण धुमाळ
माजी सरपंच सोनके
——————–
ऊस कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न
दरम्यान रस्ता व पावसाच्या परिस्थितीमुळे ऊस तोडणीच्या कामाचा खोळंबा होत असल्याने ऊस तोड कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न जटिल झाला आहे.परिणामतः त्यांना आता पर्यायी रोजगाराचा शोध घ्यावा लागत आहे.
—————————

Adv