फलटण : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ फलटण येथे बंद पुकारुन, बेकायदा जमाव जमवून दुकाने बंद करा, असे आवाहन केल्याप्रकरणी फलटणचे राष्ट्रवादीचे आमदार दीपक चव्हाण यांच्यासह 40 ते 50 जणांवर फलटण शहर पोलिस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये पं. स. सदस्य विश्वजितराजे रघुनाथराजे नाईक निंबाळकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मिलींद नेवसे यांचा समावेश आहे.
ईडीने शरद पवार यांच्यावर राज्य बँक घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर राज्यभर राष्ट्रवादीच्यावतीने बंद निदर्शने आदी प्रकारची आंदोलने करण्यात येत आहेत. बुधवारी फलटण येथेही बंदचे आवाहन करण्यात आले होते. याबाबत कोणत्याही प्रकारची पोलिस प्रशासनाकडून परवानगी घेण्यात आली नव्हती. आ. दीपक चव्हाण, विश्वजितराजे नाईक निंबाळकर, मिलींद नेवसे यांच्यासह 40 ते 50 जणांनी बेकायदेशीर जमाव जमवून, रॅली काढून, व्यापारांना दुकाने बंद करा, असे आवाहन केले. फलटण येथील नाना पाटील चौक, आंबेडकर चौक, गजानन चौक आदी परिसरात ही घटना घडली.
याबाबत आ. दीपक चव्हाणांसह 40 ते 50 जणांविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा फलटण शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून राजकीय आकसापोटी पोलिस प्रशासनावर दबाव आणून राष्ट्रवादीस त्रास देण्याचा उद्योग होत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
Home Satara District Phaltan फलटणचे राष्ट्रवादीचे आमदार दीपक चव्हाण यांच्यासह 40 ते 50 जणांवर फलटण शहर...