शहराच्या काही भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाची पाणीपातळी अकरा फुटांवर पोहचली असून या पाणीसाठ्याची पदाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी पाहणी केली होती त्यामुळे आता एक दिवस कपातीचा निर्णय घेतला असल्याची माहिती पाणीपुरवठा सभापती यशोधन नारकर यांनी दिली आहे
उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या उदभवू नये, यासाठी प्रशासनाकडून यंदाही पाणीकपातीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, पाणी पुरवठा सभापती यशोधन नारकर, अभियंता दिग्विजय गाढवे यांनी कास तलाव परिसराची पाहणी करून परिस्थितीचा अंदाज घेतला होता तलावाची पाणी पातळी सध्या अकरा फूट आहे आणि पाण्याची उचल 6 दशलक्ष घनमीटर इतकी आहे. हा साठा किमान 15 जूनपर्यंत पुरवायचा झाल्यास एक दिवसाचा शटडाऊन घेणे क्रमप्राप्त असून तलावात दोन महिने पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध असला तरी पाऊस लांबणीवर गेल्यास अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. म्हणून पाणी कपातीचा निर्णय घेत असल्याची माहिती पाणीपुरवठा सभापती यशोधन नारकर यांनी सातारानामा शी बोलताना सांगितले
त्यामुळे प्रत्येक पेठेचा पाणीपुरवठा आठवड्यातून एक दिवस बंद ठेवण्याबाबत प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सातारा शहराच्या काही भागाला कास व शहापूर योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. कास ही साताऱ्याची सर्वात जुनी पाणीयोजना आहे.
कासमधून प्रतिदिन साडेपाच लाख तर शहापूरच्या माध्यमातून साडेसतरा लाख लीटर पाणीपुरवठा शहराला केला जातो. 25 फूट साठवणक्षमता असलेल्या कास तलावाचा पाणीसाठ्याच्या बाष्पीभवनाचा वेग उन्हाच्या रखरखीमुळे वाढला आहे. तलावातील तीनपैकी पहिला व्हॉल्व्ह उघडा पडला असून दुसऱ्या व्हॉल्व्हद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. पावसाळा सुरू होण्यासाठी आणखी दोन महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे प्रशासनाला पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करावे लागणार आहे.
निर्णयामुळे झाली होती पाणीबचत
पाणीटंचाईच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने गतवर्षी पाणीकपातीचा निर्णय घेतला. यानुसार प्रत्येक पेठेचा पाणीपुरवठा आठवड्यातून एक दिवस बंद ठेवण्यात आला. कपातीच्या 28 दिवसांच्या कालावधीत तब्बल 3 कोटी 60 लाख लिटर पाण्याची बचत झाली होती. नागरिकांनीही आपत्कालीन परिस्थितीत पाण्याचा काटकसरीने वापर केला. यंदाही अशीच परिस्थिती उदभवण्याची चिन्हे असल्याने पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे