स्वच्छ भारत नागरी अभियाना अंतर्गत पाचगणी गिरीस्थान पालिकेस पश्चिम विभागातील प्रथम क्रमांक मिळाला आहे. नवी दिल्ली येथे आज केंद्रीय स्वच्छ भारत संचालनालय संचालक रूपा मिश्रा, केंद्रीय नगर विकास विभाग सचिव मनोज शर्मा यांच्या हस्ते पाचगणीचे मुख्याधिकारी तथा प्रशासक निखिल जाधव यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि केंद्रीय शहर विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या उपस्थितीत होते.
केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि शहर विकास मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षणात देशाच्या पश्चिम विभागात महाराष्ट्र कर्नाटक गोवा गुजरात मध्य प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. पाच राज्यातील पन्नास हजार ते एक लाख लोकसंख्येच्या आतील पालिकांमध्ये पाचगणी पालिकेने प्रथम क्रमांक मिळवला आहे. गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालय यांच्या वतीने दरवर्षी स्वच्छता अभियान राबवले जाते. या अभियाना अंतर्गत केंद्र सरकारने नियुक्त केलेले पथक वेगवेगळ्या निष्कर्षानुसार सर्वेक्षण करते व देशपातळीवर आणि राज्यपातळीवर विभागनिहाय क्रमांक दिले जातात. पाचगणी पालिकेने कार्यक्षम प्रशासक तथा मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी शहरातील नागरिक, स्वच्छता कर्मचारीं सर्व पालिका कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने राबविलेल्या उपक्रमात पालिकेला प्रथम क्रमांक मिळाला आहे. प्रशासकीय राजवटीतही नगरपरिषदेचे कार्यक्षम मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
पाचगणी गिरीस्थान पालिकेस स्वच्छ्ता अभियानात सलग तिसऱ्यांदा पुरस्कार मिळाला आहे.पालिका कार्यक्षेत्रात स्वच्छते साठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचा आहे.पालिका कर्मचारी,नागरिक व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने आज हा पुरस्कार मिळवू शकलो.त्यामुळे सर्व नागरिकांचे आभार व अभिनंदन करतो.-निखिल जाधव,मुख्याधिकारी तथा प्रशासक, पाचगणी