पाल ता. कराड येथील श्री खंडोबा देवाची वार्षिक यात्रा 6 ते 13 जानेवारी 2020 या कालावधीत साजरी होणार आहे. या अनुषंगाने पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना प्राप्त झालेल्या महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 36 प्रमाणे अधिकारास अनुसरुन पाल यात्रेतील मानकारी यांचे मानाचे बैलगाडीबाबतीत अटी व शर्थी संबंधीचे आदेश दि. 8 जानेवारी रोजीच्या सकाळी 8 पासून ते दि. 9 जानेवारी 2020 रोजीच्या सकाळी 6 पर्यंत जारी केले आहेत.
यात्रेत सामिल होणाऱ्या बैलगाडीवान यांनी गाडी ओढणाऱ्या बैलांना वेसन घातलेली असावी. तसेच नेहमी जुंपण्यात येणाऱ्या व माणसाळलेल्या बैलांचाच वापर करावा. प्रत्येक गाडीत 5 पेक्षा जास्त लोकांनी बसू नये. मिरवणुकीच्यावेळी दोन्ही बैलगाड्यामध्ये सुरक्षित अंतर असावे. प्रत्येक गाडीमालकाने आपल्या गाडीपासून इतरांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी.
8 जानेवारी रोजी मुख्य मिरवणुकीकरीता मानकरी यांनी आपल्या बैलगाड्या, ट्रॅक्टर, जिप घेवून श्री बाबासाहेब इंजोजीराव पाटील रा. पाल यांच्या वाड्यासमोर जमावे व आपले मानाप्रमाणे उभे रहावे. मुख्य मिरवणुकीतील वाहनांची व जनावरांची तपासणी सबंधित तज्ञांकडून करुन घ्यावी व ते मिरवणुकीस वापरण्या योग्य असल्याचे प्रमाणपत्र घ्यावे. सायंकाळी श्री खंडोबा देवाचा लग्न सोहळा संपन्न झाल्यानंतर सर्व मानकरी आपआपल्या बैलगाड्या, ट्रॅक्टर, जिप घेवून त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी घेवून जातील 9 जानेवारी रोजी पहाटे 4 वाजता रितीरिवाजाप्रमाणे मानकरी आपल्या बैलगाड्या, ट्रॅक्टर, जिप बोहल्याच्या ठिकाणी मानाप्रमाणे उभ्या करतील. तेथून देवाची मुर्ती पालखीतून मंदिरात जाण्यासाठी मिरवणुकीने निघताच सर्व मानकऱ्यांनी आपल्या बैलगाड्या, ट्रॅक्टर, जिप मिरवणुकीच्या मार्गाने खंडोबा देवाच्या मंदिरात 6 वाजता आणाव्यात. देवाची मुर्ती मंदिराच्या गाभाऱ्यात ठेवल्यानंतर सर्वांनी आपआपल्या गाड्या घेवून जाव्यात.
तसेच 8 जानेवारी हा यात्रेचा मुख्य दिवस असून मिरवणुकीसंबंधी मानकरी यांना वागण्याबाबत खालील नियम करण्यात आलेले आहेत.
यात्रेच्या मुख्य दिवशीच्या मिरवणुकीमध्ये सामिल होणा-या मानाचा घोडा यास लगाम घातलेला असावा. तसेच मिरवणुकीमध्ये माणसाळलेला, शिकावू घोडयाचाच वापर करावा. इतर भाविकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. 8 जानेवारी रोजी मुख्य मिरवणुकीकरीता 8 मानकरी श्री बाबासाहेब इंजोजीराव पाटील रा.पाल ता.कराड यांचे वाडयासमोर जमावे व आपले मानाप्रमाणे उभे रहावे. दुपारी 2 वा.श्री.महिपती शंकरराव पवार रा.शिवणीता.खानापुर यांचे बैलगाडीतून देव देवळाच्या मंडपातून बाहेर आणल्यानंतर तेथून देवाची मिरवणूक मानकरी श्री. देवराज बाबासो पाटील रा.पाल ता.कराड यांचे समवेत मिरवणुकीने निघावे. सदरवेळी मानाचा घोडा व चोपदार यांनी मिरवणूकीचे पुढे रहावे. सायंकाळी 6 वा.देवाचे लग्नाचा सोहळा संपन्न झाल्यानंतर मानकरी आपला घोडा आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी घेवून जातील.
मुख्य मिरवणुकीतील घोडयाची तपासणी संबधित पशु वैद्यकीय अधिकारी यांचेकडून करुन घ्यावी व ते मिरवणुकीस वापरण्यास योग्य आहेत याबाबतचे प्रमाणपत्र घ्यावे. मानकरी यांना वरील प्रमाणे अटी व शर्ती मान्य नसतील तर त्यांनी आपले घोडे मिरवणुकीमध्ये आणु नये. मिरवणुकीतील मानकरी यांचे घोडयाचे चालक यांना वरील अटी व शर्तीप्रमाणे वागण्याचे बंधन राहिल. वरील नियमांचे उल्लघन केल्यास मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३४ अन्वये कारवाईस पात्र रहातील याची सर्व संबधितांनी नोंद घ्यावी.