राज्यातील ७ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, यादीत महत्त्वाच्या नावांचा समावेश

102
Adv

राज्याच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे विराजमान झाल्यानंतर लक्ष लागून राहिलेल्या सनदी अधिकार्‍यांच्या बदल्यांचा निर्णय अखेर राज्य सरकारने सोमवारी घेतला. या बदल्यांमध्ये अनेक महत्वपूर्ण अधिकार्‍यांच्या बदल्यांसदर्भात प्रशासनाने निर्णय घेतला असून त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बदली म्हणजे डॉ. भूषण गगराणी. गगराणी यांची अखेर मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. गगरानी यांच्यासह महसूल आणि वन विभागाचे प्रधान सचिव विकास खरर्गे यांची देखील वर्णी आता मुख्यमंत्री कार्यालयातील प्रधान सचिव पदावर लागली आहे. या महत्वपूर्ण बदल्यांमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जाणारे सचिन कुर्वे यांनाही साईड पोस्ट करुन त्यांची रवानगी थेट महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणात करण्यात आली आहे. दरम्यान, सोमवारी ७ अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या असून येत्या काळात आणखीन काही अधिकार्‍यांच्या बदल्या देखील होणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

अशी आहे यादी :

१. डॉ. बी. ए. गगराणी, आयएएस (१९९०) यांची मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून मंत्रालयात नियुक्ती करण्यात आली आहे.
२. विकास खर्गे, आयएएस (१९९४) यांची वनविभागाच्या प्रधान सचिव पदावरून मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून मंत्रालयात बदली करण्यात आली आहे.

३. डॉ. निपुण विनायक, आयएएस (२००१) यांची महापालिका प्रशासन कार्यभारासाठी आयुक्त-संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
४. सचिन कुर्वे, आयएएस (युएल-२००३) यांची महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
५. ए. ई. रायते, आयएएस (२००७) यांची विक्रीकर सह आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
६. अमोल येडगे, आयएएस (२०१४) यांची माहिती-तंत्रज्ञान विभागाचे संचालकपदावरून अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.
७. के. एच. बगाटे यांची नंदुरबारमधील सरदार सरोवराचे अतिरिक्त जिल्हाधिकारीपदावरून रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.

साधारणपणे पहिल्या टप्य्यात तीसहून अधिक अधिकार्‍यांच्या बदल्या केली जातील, असा अंदाज वर्तवला जात होता. त्यामुळे या बदल्यांमध्ये कोणकोणत्या अधिकार्‍यांचा नंबर लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. यात प्रामुख्याने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील सनदी अधिकार्‍यांची वर्णी कोणत्या पदावर होते? याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले होते. अखेर सोमवारी प्रशासनाने बदल्यांचे आदेश जाहीर करीत एकूण ६ अधिकार्‍यांच्या बदल्या जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्र केडरचे १९९० च्या बॅचचे भूषण गगरानी यांचा प्रशासकीय सेवेतील असलेला दांडगा अनुभव लक्षात घेता त्यांची वर्णी या पदावर लावण्यात आली आहे.
या बदल्यांमध्ये बहुचर्चित सचिन कुर्वे यांची देखील बदली करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जाणारे कुर्वे यांना साईड पोस्टिंग देण्यात आली असून त्यांची बदली महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरण येथे करण्यात आली आहे. सचिन कुर्वे हे उत्तराखंड कॅडरमधील २००३ मधील सनदी अधिकारी आहेत. आतापर्यंत त्यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी, त्यानंतर मुंबईचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर त्यांची बदली मुख्यमंत्री कार्यालयात सचिव पदी करण्यात आली होती. तर आता बदली होण्यापूर्वी राष्ट्रपदी राजवटीच्या काळात राज्यपालांच्या सचिव पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर डॉ. निपुण विनायक यांची वर्णी महापालिका प्रशासकीय संचालक पदी करण्यात आली आहे. तर मुंबईच्या विक्री कर विभागाच्या सह आयुक्तपदी ए.ई.रायते यांची बदली करण्यात आले असून ते महाराष्ट्र केडरच्या २००७चे सनदी अधिकारी आहेत. तर राज्याच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या संचालकपदाचे काम पाहणारे अमोल येडगे यांची बदली अमरावती जिल्हा परिषदाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. तर नंदुरबारच्या सरदार सरोवर प्रकल्पाचे काम पाहणारे अतिरिक्त जिल्हाधिकारी के.एच.बागते यांची बदली रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर करण्यात आली आहे.

Adv