करोनाची दहशत प्रचंड असली तरी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी होणारी गर्दी आता डोकेदुखी ठरत आहे . त्यामुळे भाजी विक्रेते व खरेदीदारांनी तीन फुटाचे अंतर ठेऊन भाजी खरेदी करायची आहे . सातारा पालिका व पोलीस यांच्या सहकार्याने शहरातल्या विविध मंडई मध्ये सुरक्षित अंतराचे पट्टे आखण्यात आले आहेत .
सातारकर प्रशासनाच्या या उपाय योजनेला किती प्रतिसाद देणार हे महत्वाचे आहे . साताऱ्यात नगर पालिकेच्या राजवाडा, सदाशिव पेठ, सदर बझार व पोवई नाका येथे चार पकक्या बांधीव भाजी मंडई आहेत . या मंडई मध्ये कट्टयांची रचना असल्याने आपोआप दोन व्यक्तींमध्ये अंतर राखले जाते . मात्र सदाशिव पेठ व पोवई नाका व राधिका रोड येथे रस्त्यावर भरणाऱ्या मंडईमुळे विनाकारण गर्दी व वादावादीचे निमित्त ठरत आहेत . आता करोनाच्या संसर्गामुळे गर्दी टाळणे अग्रक्रमाचा विषय आहे आणि जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीवरून सामान्य नागरिक व पोलीस यांच्यात वादावादीचे प्रसंग घडू लागले आहेत . यावर आता एक उपाय शोधण्यात आला आहे . मंडईतील विक्रेते व ग्राहक यांच्यासाठी रस्त्यावर पांढऱ्या रंगाचे पट्टे मारण्यात आले असल्याची माहिती पालिकेचे वरिष्ठ अधिकारी प्रशांत निकम यांनी यावेळी दिली. दोन चौकोनामध्ये साडेतीन फुटाचे अंतर ठेवण्यात आले आहे .पालिकेचा शहर विकास विभाग व सातारा शहर व शाहुपुरी पोलिसांनी एकत्र मिळून या उपाययोजना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने राबवण्यात आल्या आहेत
साताऱ्यात संचारबंदी विषयी स्पष्ट सूचना असतानाही सातारकरांच्या मनात जीवनावश्यक वस्तूंच्या संदर्भात अजूनही संभ्रम आहे . जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यात येऊ नये अशा स्पष्ट सूचना असतानाही नागरिक मात्र त्याच वळणानी जात आहेत . खरेदीसाठी बाहेर पडणे, सूचना मिळूनही वाहनाचा वापर करणे त्यामुळे होणाऱ्या गर्दीमुळे ताणतणावाचे प्रसंग घडत आहेत .करोना टाळण्यासाठी प्रशासन जीवतोड मेहनत करत असताना केवळ अट्टाहासाने बाहेर पडण्याचे धाडस हे जीवावर बेतणारे ठरू शकते त्यासाठी सातारकरांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे .