खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले ‘धक्कातंत्र’ देण्यात माहीर असल्याची प्रचिती शुक्रवारी सातारकरांना ग्रेड सेपरेटरच्या निमित्ताने आली. या धक्कातंत्राची पुनरावृत्ती सोमवार, दि. ११ रोजी पालिका सभापती निवडीतही होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
सातारा पालिकेतील विषय समिती सभापतींचा कार्यकाल दि. ३ जानेवारी रोजी पूर्ण झाला आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या पदांच्या निवडीसाठी दि. ११ रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पालिकेत खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीची सत्ता आहे. पालिका निवडणुकीपासून चार वर्षांच्या कार्यकाळात आघाडीप्रमुखांनी जवळपास पंधरा नगरसेवकांना उपनगराध्यक्ष व सभापतीपदी काम करण्याची संधी दिली. मात्र, अद्याप काही महिला नगरसेवकांवर कोणतीही जबाबदारी सोपविण्यात आली नाही. आजवर त्यांना केवळ चर्चेवरच समाधान मानावे लागले आहे.
सातारा शहराची नुकतीच झालेली हद्दवाढ व आगामी पालिका निवडणुकीमुळे यंदाच्या सभापती निवडीला विशेष महत्व आले आहे. त्यामुळे गतीशील व कृतीशील नगरसेवकांना यंदा सभापतीपद मिळण्याची शक्यता आहे. मात्र, उदयनराजे भोसले यांचे धक्कातंत्राने सर्वजन परिचित आहे. ‘जबाबदारी सोपविल्याशिवाय नेतृत्व घडत नाही’ असं खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे नेहमीत सांगतात. त्यामुळे यंदा जुन्या व अनुभवी नगरसेवकांना सभापतीपदाची संधी मिळणार की नव्या चेहऱ्याच्या गळ्यात सभापतीपदाची माळ पडणार? याचे उत्तर फक्त खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे आहे. सोमवारी होणाऱ्या
या निवडीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
चौकट –
सभापती पदासाठी संभाव्य नावे ? _
पाणी पुरवठा – सीता हादगे
महिला व बालकल्याण – रजनी जेधे
आरोग्य सभापती – अनिता घोरपडे ( मुदतवाढ )
बांधकाम – सिद्धी पवार
नियोजन – स्नेहा नलावडे