राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांमध्ये माजी मंत्री शशिकांत शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे. या पार्श्वभूमीवर शशिकांत शिंदे पुन्हा विधीमंडळात जातीलच, याबाबतचा आत्मविश्वास त्यांचे कार्यकर्ते व्यक्त करू लागल्याने ही संधी शिंदे यांना मिळणार का, याकडे आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या येत्या चार-पाच दिवसांतील राजकीय घडामोडींकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी येत्या ११ तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीकडून पाच ते सहा जागांवर दावा सांगितला जात असून, त्यापैकी दोन जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येतील, असे चित्र आहे. माजी मंत्री शिंदे यांना विधीमंडळातील कामकाजाचा तब्बल २० वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी सुरवातीला जावळी मतदारसंघाचे दोन वेळा व त्यानंतर कोरेगावचे दोन वेळा प्रतिनिधित्व केले आहे. आक्रमक नेता, अभ्यासपूर्ण शैलीत विविध प्रश्न मांडून ते सोडवून घेण्याची धमक ठेवणारा, प्रशासनाशी सौहार्दपूर्ण संबंध राखणारा प्रसंगी सार्वजनिक कामे करून घेण्यासाठी कठोरपणा दाखवणारा नेता, अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यामुळेच पक्षाचे प्रवक्ते म्हणूनही त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
सातारा जिल्हा हा पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. तो अबाधित राखण्याची जबाबदारी श्री. शिंदे यांच्यावर आली होती. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी जिल्हाभर रान उठवले. विधानसभा निवडणुकीत विधानसभेच्या तीन जागा राखण्यात राष्ट्रवादीला यश मिळाले. मात्र, निवडणुकीच्या धावपळीत स्वत:च्या कोरेगाव मतदारसंघात निर्णायक क्षणी लक्ष घालण्यास वेळ अपुरा पडल्याने त्यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले.
राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे यांना निश्चितपणे संधी मिळेल, असा आत्मविश्वास कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. त्यासाठीच दस्तुरखुद्द शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, यांच्याकडे शशिकांत शिंदे यांच्या उमेदवारीची आग्रही मागणी केल्याचे कोरेगाव मतदारसंघातील व सातारा जिल्ह्यातील पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सांगत आहेत.