मुंबई-पुणे येथून येणाऱ्या सातारा जिल्ह्यातील 21 हजार प्रवाशांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यांना सर्दी, खोकला किंवा ताप आल्यास तात्काळ आरोग्य यंत्रणेला कळविण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. जे प्रवासी नोंदणी करावयाचे राहिले असल्या ग्रामीण भागातील पोलीस पाटील व शहरी भागातील नागरिकांनी नगर परिषदेकडे नोंदणी करावी. ज्या प्रवाशांना घराबाहेर पडावयाचे नसल्यास त्यांनी https://forms.gle/MKCCCVGMnxU9dwK58 या लिंकचा तसेच खालील दिलेल्या क्युआर कोडचा वापर करुन घरी बसल्याबसल्या नोंद करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
महाबळेश्वर व पाचगणी नगरपरिषद हद्दीतील अनिवासी तसेच स्थानिक नसलेल्या व्यक्तींनी 23 मार्चच्या दुपारी 12 वा. पर्यंत सातारा जिल्हा सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. परदेशवारी करुन आलेल्या नागरिकांना घरातच अलगीकरण करण्यात आले आहे. या नागरिकांनी आरोग्य विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करुन घराबाहेर पडू नये, असे आवाहनही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शेवटी केले.
जिल्ह्यातील अंतर्गत वाहतूक बंद करण्यात येणार, असे सांगून पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते पुढे म्हणाल्या, कलम 144 लागू करण्यात आले असून 5 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. 20 चेक पोस्ट तयार करण्यात आले असून कामाव्यतिरिक्त फिरणाऱ्या व्यक्तींना परत पाठविण्यात येत आहेत. नागरिकांनी जीवनावश्यक वस्तु आणताना दूरच्या दुकानात न जाता घराशेजारी दुकानाचा वापर करावा. यासाठी वाहनाचा वापर करु नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी या पत्रकार परिषदेत केले.