नियोजित सातारा आयटी पार्कसाठी खा.श्रीमंत छ उदयनराजे भोसले व मा.ना.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. त्याबद्दल प्रथमतः दोघांचे आम्ही आभार मानतो.आम्ही गेले १० ते १२ वर्षापासून स्थानिक पातळीवर आयटी सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधी असून आमच्याकडे प्रत्येक कंपन्यांमध्ये मिळून 600 पेक्षा जास्त तरुणांना आम्ही रोजगार दिलेला आहे.
आमच्याकडील काही कंपन्या आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील चांगल्या प्रकारे काम करीत आहेत. सध्या केंद्र शासनाच्या अनेक योजना उद्योजकांसाठी अनुकूल असल्याने सातारासारख्या शहरांमध्ये आयटी उद्योग वाढीसाठी संधी निर्माण झाल्या आहेत. परंतु जागेअभावी आयटी पार्कचा प्रश्न प्रलंबित होता. सध्या नागेवाडी आणि गोडोली येथील शासनाच्या जागा यासाठी विचाराधिन असल्याचे समजले. आम्हा सर्वांच्या मते दोन्ही जागांपैकी आयटी पार्क पहिल्या टप्प्यात गोडोली येथील पशुसंवर्धन खात्याच्या जागेवर सुरुवात करणे संयुक्तिक ठरेल असे आम्हाला वाटते. दळण-वळण व इतर भौतिक सुविधा तसेच भविष्यात BPO सेंटर झाल्यास रात्रंदिवस कंपन्या चालू शकतात त्यामुळे महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शहरालगत आयटी कंपन्यांसाठी जागा असणे गरजेचे आहे. भविष्यात पुढील विस्तारासाठी नागेवाडीतील जागेचा विचार व्हावा तसेच आयटी पार्कमधील जागा फक्त आणि फक्त आयटी उद्योजकांनाच मिळाव्यात व त्यासाठी विशेष अटीं शर्तींचा समावेश करावा.
सदरचे निवेदन राज्याचे उद्योगमंत्री मा.ना.उदयजी सामंत, मा.खा.श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व ना श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले,जिल्हाधिकारी सातारा,प्रादेशिक अधिकारी एम.आय.डी.सी.सातारा यांना देण्यात आले आहे.