धक्कातंत्रासाठी प्रसिद्ध असणाऱ्या खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी ग्रेड सेपरेटरचे उदघाटन करून सातारकरांना सुखद धक्का दिला . ग्रेड सेपरेटर सातारकरांसाठी आजपासून खुला झाल्याची घोषणा त्यांनी केली . सातारा विकास आघाडीच्या या बहुचर्चित व अनपेक्षित उदघाटनाची जिल्हाभर जोरदार चर्चा झाली .
वाहतूक कोंडीतून सातारकरांची सुटका करणाऱ्या पोवई नाक्यावरील ग्रेड सेपरेटरचे काम पूर्ण झाल्याने सर्वांना त्याच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लागली हाेती. या पार्श्वभूमीवर आज (शुक्रवारी) खासदार श्री छ उदयनराजे भोसले कामाची पाहणी करण्यापुर्वी पहिल्या टप्प्यातील रस्त्यावर फित कापून ग्रेड सेपरेटरमध्ये प्रवेश केला. उदयनराजे यांनी नगराध्यक्ष माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, पक्षप्रतोद निशांत पाटील , स्वीकृत नगरसेवक अॅड दत्ता बनकर, यांच्यासह सर्व सदस्यांना घेऊन ग्रेड सेपरेटरच्या अंर्तगत मार्गांची उघडया वाहनातून पाहणी केली . या पाहणीच्या निमित्ताने शाहू चौक ते तहसीलदार कार्यालय आणि पंचायत समिती ते पारसनीस कॉलनीकडून अंर्तगत रस्त्याने पुन्हा शाहू चौक असा जंगी रोड शो झाला . राजे समर्थकांनी एक नेता एक आवाज उदयन महाराज अशा जोरदार घोषणा दिल्या .
७६ कोटी रूपये खर्च झालेल्या या ग्रेड सेपरेटरच्या सर्व मार्गिकांची खासदार उदयनराजे भोसले आतून पाहणी करणार असल्याचे आघाडीच्या सूत्रांनी सांगितले.त्यानूसार आज (शुक्रवार) सकाळी दहा वाजता खासदार उदयनराजेंनी सातारा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या लवाजमासह ग्रेड सेपरेटरच्या पहिल्या टप्प्यातील रस्त्यावर पाेचले.
तेथे त्यांनी फित कापली. प्रत्यक्षात पाहणी असताना उदयनराजे यांनी ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन करून सातारकरांना आश्चर्यचकित केले . ग्रेड सेपरेटरच्या दुतर्फा उभे राहून सातारकरांनी हा सोहळा अनुभवला . नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनाेज शेंडे , माजी नगराध्यक्ष रंजना रावत, गीतांजली कदम, माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, काका धुमाळ, संग्राम बर्गे, स्वीकृत नगरसेवक बाळासाहेब ढेकणे, माजी नगरसेवक कल्याण राक्षे, सभापती संगीता आवळे , भाजपच्या सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष पंकज चव्हाण,यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व टी ऍण्ड टी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित हाेते. त्यानंतर उदयनराजेंनी ग्रेड सेपरेटरची पाहणी केली.
चौकट-
ग्रेड सेपरेटर सुरू होणार अभी के अभी
ग्रेड सेपरेटरच्या संपूर्ण कामाचे श्रेय हे संपूर्ण सातारकरांचे असल्याचे उदयनराजे यांनी नमूद केले . आपल्या २९ वर्षाच्या राजकीय वाटचालीत सातारकरांचा मोठा वाटा असल्याचे सांगून उदयनराजे म्हणाले, मला धक्का देण्याची सवय आहे, हे उद्घाटन तसेच धक्कातंत्र होते .कधी मी धक्का देतो कधी मला धक्के खावे लागतात अशी मिश्किली त्यांनी केली . ग्रेड सेपरेटर खुला कधी होणार या प्रश्नावर ग्रेड सेपरेटर खुला होणार अभी के अभी असा जोरदार डायलॉग उदयनराजे मारल्यावर राजे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली .
खा श्री छ उदयनराजे बॅक इन अॅक्शन
उदयनराजे यांनी आपल्या पाहणी रोड शो मध्ये पुन्हा एकदा कॉलर उडविण्याची सिग्नेचर स्टाईलने उदयनराजे यांनी तरुणाईला खुश केले . अशा अनपेक्षित उद्घाटनाने राजकीय नाराजी निर्माण होणार नाही का ? या प्रश्नावर मी फक्त माझे काम करतो असे उत्तर दिले . उदयनराजे यांच्यासमवेत सातारा विकास आघाडीचे सर्व सदस्य झाडून उपस्थित होते . आगामी पालिका निवडणुकांसाठी सातारा विकास आघाडी सक्रीय होत असल्याची झलकच उदयनराजे यांनी या निमित्ताने दाखविली .