माजी पीए चतुर यांना जिल्हा परिषदेत नियुक्तीवरून दणका

89
Adv

जिल्हा परिषदेच्या अधिनियमात पदाधिकार्‍यांनी खासगी स्वीय सहाय्यक नेमण्याची तरतूद नसतानाही जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांनी जिल्हा परिषदेत खासगी स्वीय सहाय्यकांची नियुक्ती केली होती. ही नियुक्ती वादाच्या भोवर्‍यात येण्याची शक्यता असून पाटी लावण्या आणि काढण्यावरुन वादंग निर्माण झाला होता. अधिकारी, कर्मचार्‍यांमध्येही या निवडीवरुन संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.खासगी स्वीय सहाय्यकांची पाटी शुक्रवारी काढण्यात आली आहे. त्यामुळे आता अध्यक्षांकडे नवीन स्वीय सहाय्यक येणार याचीच उत्सुकता लागून राहिली आहे.

जिल्हा परिषदेमध्ये पदाधिकारी स्वीय सहाय्यक म्हणून जिल्हा परिषद सेवेतील कर्मचार्‍याची नियुक्ती करु शकतात. त्यानुसार आतापर्यंत सर्व पदाधिकार्‍यांनी तशा नियुक्त्या केल्या होत्या. विद्यमान अध्यक्ष उदय कबुले यांच्याकडे सुनील चतूर आणि युवराज मांढरे असे दोन स्वीय सहाय्यक कार्यरत होते. चतूर दि. 31 मे रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी मांढरे यांनी चतुरांची पाटी काढून टाकली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर चतुर आणि मांढरे यांच्यात तू तू मै मै’ झाल्याच्या प्रकाराची खुमासदार चर्चा जिल्हा परिषदेत होती. त्यातच सर्वसाधारण सभेच्या आदल्या दिवशी अध्यक्ष कबुले यांच्या पत्रानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी भागवत यांची चतुर यांची अध्यक्ष कबुले यांनी खासगी स्वीय सहाय्यक म्हणून नेमणूक केली असून त्यांना सर्व खातेप्रमुखांनी सहकार्य करावे, असे पत्र काढले होते.
जिल्हा परिषदेत पदाधिकार्‍यांना खासगी स्वीय सहाय्यकाची नेमणूक करण्याबाबत घटनेत तरतूद नसल्याचे सांगण्यात येत असतानाच चतुर यांना नियुक्तीचे पत्र मिळण्यापूर्वीच त्यांच्या नावाची पाटी अध्यक्षांच्या दालनाबाहेर पुन्हा झळकली होती. खासगी स्वीय सहाय्यक नेमण्याऐवजी जिल्हा परिषद सेवेतील कर्मचार्‍याला संधी द्यायला पाहिजे होती, असाही सूर जिल्हा परिषदेच्या वर्तुळात होता. मात्र चतूर हे अनुभवी आणि हुशार असल्याचे पत्र देत अध्यक्षांनी त्यांना खासगी स्वीय सहाय्यक म्हणून संधी द्यावी, असे सुचवले होते. चतुर यांच्या निवडीवरुन जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि कर्मचार्‍यांमध्ये संभ्रमावस्था होती. विविध कर्मचारी संघटनांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली होती. जिल्हा परिषदेत हुशार आणि अनुभवी कर्मचारी नाहीत का? अशी टीकाही होत होती. वास्तविक चतुर हे अनुभवी आहेत त्यामुळे अध्यक्षांनी त्यांना संधी दिल्याचे बोलले जात आहे. खासगी स्वीय सहाय्यकांच्या निवडीवरुन जोरदार टीका, टिपण्णी झाली. चतूरही दोन दिवसांपासून जिल्हा परिषद कार्यालयात आले नव्हते. शुक्रवारी सकाळी त्यांच्या नावाची पाटी काढून टाकण्यात आल्याने आता नवीन स्वीय सहाय्यक कोण होणार याचीच चर्चा जिल्हा परिषदेत सुरु आहे.
जिल्हा परिषद अधिनियमानुसार पदाधिकार्‍यांना खासगी स्वीय सहाय्यक नेमण्याची तरतूद नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अध्यक्ष उदय कबुले यांच्या सुचनेनुसार खासगी स्वीय सहाय्यक नेमण्यात आला. अध्यक्षांच्या दालनाबाहेरच खासगी स्वीय सहाय्यकांचे दालन आणि दालनाबाहेर नवीन पाटीही झळकली. वास्तविक खासगी स्वीय सहाय्यक नेमण्यास कोणाचीच हरकत नसणार मात्र जिल्हा परिषदेत खासगी स्वीय सहाय्यकांना दालन, फोन, सहाय्यक, शिपाई देण्याचीही व्यवस्था आहे. स्वीय सहाय्यकांच्या दालनाबाहेर त्यांची पाटी झळकल्याने या नियुक्तीला विरोध वाढत गेला.

Adv