करोना पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सव साजरा करण्याबाबत शासन नियमांच्या अनुषंगाने मंडळांमध्येही उत्सव साजरा करण्याबाबत बैठका सुरू आहे. मात्र, याचा परिणाम मंडळाच्या गणेश मूर्तींचे रंगकाम करणाऱ्यांना बसला आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा कारखान्यात मोजक्याच मूर्तींचे रंगकाम सुरू आहे.
मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होतो. यासाठी मूर्ती, देखाव्यांची निर्मिती करणाऱ्या कलाकारांकडे रेलचेल असते. मात्र, करोनामुळे राज्य शासनाकडून गणेशोत्सव साजरा करण्याबाबत नियमावली जाहीर केली आहे. त्यामुळे सध्या मंडळांमध्ये यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्याबाबत चर्चा, बैठका सुरू आहेत. तर काही मंडळांच्या बैठका अद्याप झालेल्या नसल्याने मंडळांच्या मूर्तींचे रंगकाम रखडले आहे.
शहरातील विविध मंडळांच्या मूर्तींना दरवर्षी रंग देऊन त्या मंडपात बसविण्यात येतात. गडकरआळी येथील कुंभारवाड्यात शहरातील नामवंत मूर्तिंचे रंगकाम केले जाते. मात्र, यंदा मंडळांचे कार्यकर्तेदेखील संभ्रमात असल्याने दरवर्षी सुमारे 150 मंडळांच्या मूर्तींचे रंगकाम होते. मात्र, यंदा कारखान्यात रंगकामासाठी आलेल्या मूर्तींची संख्या हातावर मोजण्या इतकीच आहे. ऐन गणेशोत्सवावेळी ताण येण्याऐवजी आम्ही मंडळांना संपर्क करत आहे. लवकर मूर्तींचे रंगकाम करण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे मूर्तिकार यांनी सांगितले.