घरात विलगीकरण केलेल्या व्यक्तीने हवेशीर आणि वेगळी खोली ज्याला संडास बाथरुम जोडलेले आहे अशा खोलीमध्ये रहावे. जवळचे नातेवाईक यांनी शक्यतो त्या रुममध्ये राहू नये व आवश्यक असलेल्या सेवा देवून नजीकच्या रुममध्ये थांबावे. अगदीच अत्यंत आवश्यक असल्यास त्या खोलीमध्ये राहणार असेल तर त्यांना रुग्णापासून कमतीत कमी एक मिटर अंतरावर रहावे.
परदेशत दौऱ्यावरुन आल्यानंतर नागरिकांनी स्वत:हून शासकीय आरोग्य यंत्रणेस संपर्क साधून माहिती कळविणे बंधनकारक आहे. परदेश दौऱ्यावरुन आल्यानंतर 104 क्रमांकावर स्वत:ची आरोग्य विषयक माहिती कळविणे बंधनकारक राहील. त्यामध्ये कोरोना सदृष्य आजाराची प्राथमिक लक्षणे आढळल्यास स्वत:हून नजीकच्या शासकीय रुग्णालयामध्ये तपासणी करावी व आवश्यकतेनुसार भरती व्हावे. अशा व्यक्तीने घरातील वृद्ध, गर्भवती स्त्री, लहान मुले व प्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात येऊ नये. अशा व्यक्तीने त्याचा वावर सिमित ठेवावा. अशा व्यक्तींनी कोणत्याही परिस्थितीत गर्दीच्या ठिकाणी जावू नये. अशा व्यक्तीने अल्कोहलयुक्त हॅन्ड सॅनिटायझर किंवा साबण आणि पाण्याने वारंवार व्यवस्थीत हात धुवावे. अशा व्यक्तीने वापरलेले ताट, पाण्याचे ग्लास, कप, जेवणाची भांडी, टॉवेल, पांघरुन, गादी आणि इतर दैनंदिन वापरातील घरगुती वस्तू घरातील इतर व्यक्तींना वापरण्यास देवू नये. अशा व्यक्तींनी पूर्णवेळ सर्जिकल मास्कचा वापर करावा. मास्क 6 ते 8 तासांनी बदलावा आणि वापरलेल्या मास्कची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. डिस्पोजेबल मास्क पुन्हा वापरु नये. अशा व्यक्तींनी/ त्यांची सुश्रुषा करणाऱ्या व्यक्तीने /निकट सहवासातांनी घरातील सुश्रुषादरम्यान वापरलेले मास्क 5 टक्के ब्लिच सोल्युशन किंवा 1 टक्के सोडीयम हायपोक्लोराईट द्रावणामध्ये निर्जंतुक करुन त्याची जाळून विल्हेवाट लावण्यात यावी.
घरी विलगीकरण केलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांसाठी सूचना
एकाच नातेवाईकाने अशा व्यक्तीची सुश्रुषा करावी. अशा व्यक्तीच्या शरिराशी थेट संपर्क येणे टाळावे आणि त्याचे वापरलेले कपडे झटकु नये. घरातील विलगीकरण कक्षाची स्वच्छता करतांना किंवा अशा व्यक्तींचे वापरलेले कपडे हाताळतांना डिसपोजेबल ग्लोव्हजचा वापर करावा. डिसपोजेबल ग्लोव्हज काढल्यानंतर हात स्वच्छ धुवावे. नातेवाईकांनी अभ्यागतांना अशा व्यक्तींना भेटू देवू नये. घरातील विलगीकरण कक्षामध्ये ठेवलेल्या व्यक्तींना जर कोव्हीड-19 बाबत लक्षणे आढळून आली तर त्याच्या निकट संपर्कात असलेल्या सर्व व्यक्तींना 14 दिवस घरातील विलगीकरण कक्षात ठेवावे. पुढील 14 दिवस किंवा अशा व्यक्तींचा प्रयोग शाळा अहवाल निगेटीव्ह येईपर्यंत त्याचा पाठपुरावा करावा.
घरच्यास्तरावरील विलगीकरण कक्षाची स्वच्छता
घरात केलेल्या विलगीकरण कक्षातील असलेल्या व्यक्तीच्या खोलीमध्ये वारंवार हातळल्या जाणाऱ्या वस्तुंचे (फर्निचर, बेड, फ्रेम, टेबल) 1 टक्के सोडीयम हायपोक्लोराईट द्रावणाने निर्जतुकीकरण करावे. शौचालयाची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण घरगुती ब्लीच किंवा फिनायलने करावी. अशा व्यक्तींच्या संपर्कात आलेले कपडे आणि आंथरुन-पांघरुन हे घरातील डिटर्जट वापरुन वेगळे स्वच्छ धुवून वेगळे वाळवावे.
वरीलप्रमाणे सुचनांचे तंतोतंत पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास नियमानुसार कारवाई करुन संस्थात्मक विलगीकरण कक्षात स्थलांतरीत करण्यात येईल. तसेच साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये व भारतीय दंड संहिता कलम 188 कलामान्वये संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल.
परदेशवारी करुन आलेल्या नागरिकांना घरातच विलगीकरण करण्यात आले आहे. या नागरिकांनी आरोग्य विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करुन या नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज केले.
कोरोना संसर्गबाबतची माहिती देण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आवाहन केले. या पत्रकार परिषदेला मुख्य कार्यकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते.
घरात विलगीकरण करण्यात आलेल्या नागरिकांवर आरोग्य विभागाचे लक्ष राहणार असून त्यांची वेळोवेळी तपासणी करण्यात येणार आहे. खबरादारीच्या उपाययोजनेसाठी त्यांच्यासोबत एक आरोग्य कर्मचारीही देण्यात येत आहे.
मुंबई-पुण्याहून अधिक प्रमाणत नागरिक आपल्या गावी येत आहेत, ग्रामीण भागातील नागरिकांनी आपल्या नोंदी गावातील पोलीस पाटलांकडे करावी तसेच शहरी भागात येणाऱ्या नागरिकांनी स्वत:हून पुढे यावे आणि आपली नोंद नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्याकडे करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.
कोरोना विषाणुचा संसर्ग होऊ नये यासाठी सातारा जिल्ह्यातील सभागृहे, मंगल कार्यालये बंद करण्याचे तसेच धार्मिक कार्यक्रम (लग्न कार्य, विधी, रिसेप्शन इत्यादी) कार्यक्रम घरगुती पद्धतीने घरच्या घरी करावेत. परंतु या कार्यक्रमांना दहा किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र जमण्यास मनाई आदेश जारी केले आहेत. तसेच सातारा जिल्ह्यातील सर्व परमिट रुम बार ॲन्ड रेस्टॉरंन्ट, 3,4 व 5 स्टार हॉटेल्स व त्यामधील बिअरबार आणि सर्व क्लब 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहे. सातारा जिल्ह्यातील सर्व नगर परिषद, नगर पंचायत व शहरी भागालगतच्या मोठ्या गावामधील आणि जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागातील ज्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या 5 हजाराच्या वर आहे अशा ठिकाणचे सर्व आडवडी बाजार 31 मार्च 2020 पर्यंत बंद करण्याचे आदेशही जारी केले आहेत. नागरिकांनी बँकेत न जाता डिजीटल व्यवहार करावे. तसेच एटीएम कार्डने एटीएम मशिनमधून पैसे काढल्यास तात्काळ हात धुवावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी यावेळी केले.
कोरोना संदर्भात विविध प्रकरणांमध्ये एकूण 11 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. विविध समाज माध्यमांतून कोरोना संसर्गाबाबत अनेक अफवा पसरत आहे, या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये. कोणी अफवा पसरवित असल्यास त्याच्यावर कायदेशीर कडक कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सद्यस्थिती
जिल्ह्यातील आत्तापर्यंत चार वेगवेगळ्या व्यक्तिंना काही लक्षणामुळे शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवून त्यांचे नमुने पुण्याला पाठविण्यात आले होते. त्या चौघांचेही रिपोर्ट निगेटिव्ह असून त्यांना कोणताही संसर्ग झाला नसल्याचे आढळून आले. आता जिल्ह्यातील विविध ठिकाणी परदेशावरुन आलेल्या नागरिकांचे त्यांच्या घरीच विलगीकरण करण्यात आले आहे, असे सद्यस्थितीत 123 नागरिक आहेत.