<उदयनराजे भोसले यांनी जलमंदिर पॅलेस येथे पालिकेतील सर्व अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यावेळी त्यांनी मुख्याधिकारी शंकर गोरे यांना चांगलेच फैलावर घेतले. कामाचा आढावा घेतल्यानंतर अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करा, दर्जेदार कामे करा, त्यासाठी बजेट वाढले तरी त्याची काळजी करू नका अशा स्पष्ट सूचना त्यांनी यावेळी दिल्या
सातारा शहरातील अस्वच्छता तसेच रस्ते व खड्ड्याबाबत पालिकेच्या कारभारावर उदयनराजे भोसले यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. रस्त्यातील खड्डे बुजविणे, कचऱ्याची व्यवस्था बघणे यासारख्या गोष्टींसाठी होणाऱ्या चालढकलीबाबत जाब विचारल्यावर अधिकाऱ्यांना घाम फुटला. तसेच शहापूर पाणीपुरवठा योजनेचे अद्ययावतीकरण, नवीन घंटागाड्यांची खरेदी यांची पूर्ण तपशिलासह माहिती घेऊन शहरातील रस्त्याचे पॅचिंग तातडीने सुरु करावे अशा सूचना उदयनराजेंनी दिल्या. तब्बल दोन तास चाललेल्या या बैठकीत उदयनराजेंनी केलेल्या झाडाझडतीमुळे अधिकाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले.
अधिकाऱ्यांनी काम करावे, काम करेल तो प्रिय असेल आणि जो काम करणार नाही त्याचे काय करायचे ते मी बोलतो असा दमही यावेळी उदयनराजेंनी भरला. त्यामुळे बैठकीतून बाहेर पडल्यानंतर अधिकाऱ्यांचे चेहरे अक्षरश: बघण्यासारखे झाले होते.