– कोरेगाव – वाई तालुक्याच्या सीमेवर डोंगरावरती वसलेल्या श्री क्षेत्र चवणेश्वर या गावास सुमारे वीस वर्षापूर्वी पर्यटनस्थळाचा क वर्ग दर्जा मिळाला. दर्जा मिळून येथील ग्रामस्थ आणि राज्याच्या कानाकोपर्यातून येणार्या भाविकांना मात्र रस्त्यासाठी अद्यापही संघर्ष करावा लागत आहे. वीस वर्षापूर्वी पर्यटनस्थळाचा दर्जा मिळूनही या गावास अद्याप पक्का रस्ता मिळाला नाही, हा कसला विकास असा प्रश्न ग्रामस्थ आणि भाविकांमधून विचारला जात आहे. या गावच्या रस्त्यासाठी मंजूर झालेला सुमारे सव्वा कोटींचा निधी काही लोकांच्या स्वार्थी भूमिकेमुळे माघारी गेल्याने ग्रामस्थ आणि भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
वाई आणि कोरेगाव तालुक्याच्या हद्दीवर निसर्गाच्या सानिध्यात चवणेश्वर या गावाची निर्मिती झाली आहे. च्यवणऋषींनी याठिकाणी वास्तव्य केले असल्याने या ठिकाणाला वेगळे महत्व प्राप्त झाले होते. गावची लोकसंख्या कमी असली तरी याठिकाणी श्री चवणेश्वर, महादेव, जानुबाई, केदारेश्वर ही मंदिरे असल्याने राज्याच्या कानाकोपर्यातून भाविक याठिकाणी येत असतात. दरवर्षी अश्विन महिन्यातील चौथा शनिवार आणि रविवार याठिकाणी मोठी यात्रा भरते. दिवसेंदिवस याठिकाणी पर्यटक, भाविकांचा लोंढा वाढू लागला आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे ग्रामस्थांनी पाठपुरावा केल्यानंतर 2000 साली चवणेश्वर गावास पर्यटनस्थळाचा क वर्ग दर्जा मिळाला. जिल्ह्याच्या नकाशावर नसलेल्या गावात अधिकारी, पदाधिकारी येवू लागले. अनेक विकासकामे मार्गी लागली. अनेक वर्ष ग्रामस्थांनी हाल अपेष्टा सहन केल्या त्याचे चीज होवू लागले. या गावच्या विकासात अडचण होती ती घाटरस्त्याच्या कामास वनविभाग परवानगीची. तत्कालीन सरपंच सौ. नीता संतोष पवार यांनी याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आ. दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे सदस्य मंगेश धुमाळ यांच्यासह प्रशासनातील विविध विभागाच्या अधिकार्यांकडे पाठपुरावा केला. अखेर खूप संघर्षानंतर वनविभागाने परवानगी दिली.
आ. दीपक चव्हाण, मंगेश धुमाळ यांच्या पाठपुराव्यामुळे रस्त्याच्या कामासाठी एक कोटी 33 लाखांचा निधी मंजूर झाला. आता रस्त्याचे काम मार्गी लागेल अशी अपेक्षा होती. या रस्त्याचे टेंडर मिळवण्यासाठी अनेक ठेकेदार सरसावले. चवणेश्वर रस्त्याचे काम आपल्याच बगलबच्च्याला मिळावे, यासाठी अनेकांनी शर्थीचे प्रयत्न केले. ज्यांच्याकडे परिपूर्ण अशी यंत्रसामर्गी असणार्या ठेकेदारांना थांबवण्यात आले. ज्या ठेकेदारांची शिफारस गेली ते ठेकेदार दोन लाख 57 हजार रुपये अनामत वेळेत भरु शकले नाहीत. अनामत रक्कम वेळेत भरली नाही त्यातच करोनाचे संकट उभे ठाकले. शासनाने अखर्चित निधी परत मागवला त्यात या रस्त्याचा निधी परत गेल्यामुळे ग्रामस्थ, भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
चवणेश्वर या गावास सन 2010 साली पर्यटनस्थळाचा दर्जा ना. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या पुढाकाराने मिळाला. मात्र गेल्या वीस वर्षात ग्रामस्थ, भाविकांपेक्षा ठेकेदारांच्या हिताचाच विचार झाल्याचे दिसत आहे. गेल्या कित्येक पिढ्यांपासूनच येथील रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने पर्यटन दर्जाचा काय उपयोग असा सवाल उपस्थित होत आहे. चवणेश्वर ग्रामस्थांचा केवळ मतासाठीच लोकप्रतिनिधींनी वापर केला असून आता आम्ही गप्प बसणार नाही. येथील ग्रामस्थांना रस्त्यासाठी 60 वर्षे संघर्ष करावा लागत असून ही बाब लोकप्रतिनिधींना न शोभणारी आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया चवणेश्वर येथील ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहेत.
‘ *ब’ वर्गाची लगीनघाई कशासाठी?*
चवणेश्वर गावास वीस वर्षांपूर्वी पर्यटनस्थळाचा क वर्ग दर्जा मिळाला. या वीस वर्षात केवळ ठेकेदारांची घरे भरण्याचे काम झाल्याचा आरोप होत आहे. दहा लाख रुपयांचे क्वांक्रिट गटर दाखवले मात्र हे काम झालेच नाही. असा अंदाधुंदी कारभार आत्तापर्यंत झाला आहे. क वर्ग दर्जात चवणेश्वर ग्रामस्थ आणि भाविकांच्या नशिबी हालअपेष्टाच आल्या आहेत. आता निधी परत गेल्याचे अपयश लपवण्यासाठी ‘ब’ वर्ग दर्जाची लगीनघाई सुरु आहे. हा दर्जा मिळाला तरी फायदा हा ठेकेदारांचाच असणार आहे. वाढीव निधी मिळवयचा आणि आपल्या बगलबच्च्यांची घरे भरायची असले उद्योग आता सहन केले जाणार नाहीत. चवणेश्वरची यात्रा 15 दिवसांवर आली आहे. तत्पूर्वी मंजूर निधी परत न मिळाल्यास प्रसंगी उपोषण, आंदोलनेही करण्यात येणार आहेत.