कोरेगाव आणि वाई तालुक्याच्या सीमेवर वसलेल्या चवणेश्वर गावास शासनाने सुमारे वीस वर्षांपूर्वी पर्यटनस्थळाचा क वर्ग दर्जा दिला. जागरुक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांच्या पाठपुराव्यामुळे वनविभागाने परवानगी दिल्यानंतर सुमारे एक कोटी 33 लाख रुपये निधी या रस्त्यासाठी मंजूर झाला. मात्र संबंधित ठेकेदाराने अनामत रक्कम वेळेत भरली नाही. त्यातच करोनाचे संकट आले आणि शासनाने अखर्चित निधी परत मागवला. शासनाच्या धोरणानुसार चवणेश्वर रस्त्यासाठी मंजूर झालेला निधी माघारी गेल्या ग्रामस्थ आणि भाविकांमध्ये संतापाची लाट असून निधी माघारी जाण्याच्या पापात वाटेकरी कोण कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोरेगाव आणि वाई तालुक्याच्या हद्दीवर निसर्गाच्या सानिध्यात चवणेश्वर गाव वसले आहे. च्यवणऋुषींनी याठिकाणी वास्तव्य केले असल्याने या ठिकाणाला वेगळे महत्व प्राप्त झाले होते. गावची लोकसंख्या कमी असली तरी याठिकाणी श्री चवणेश्वर, महादेव, जानुबाई, केदारेश्वर ही मंदिरे असल्याने राज्याच्या कानाकोपर्यातून भाविक याठिकाणी येत असतात. दरवर्षी अश्विन महिन्यातील चौथा शनिवार आणि रविवार याठिकाणी मोठी यात्रा भरत असते. दिवसेंदिवस याठिकाणी पर्यटक, भाविकांचा लोंढा याठिकाणी वाढू लागला. विधान परिषदेचे विद्यमान सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे ग्रामस्थांनी पाठपुरावा केल्यानंतर 2000 साली चवणेश्वर गावास पर्यटनस्थळाचा क वर्ग दर्जा मिळाला. जिल्ह्याच्या नकाशावर नसलेल्या गावात अधिकारी, पदाधिकारी येवू लागले. अनेक विकासकामे मार्गी होवू लागली. अनेक वर्ष ग्रामस्थांनी हाल अपेष्टा सहन केल्या त्याचे कुठे तरी चीज होवू लागले.
चवणेश्वर विकासात अडचण होती ती घाटरस्त्याच्या कामास वनविभाग परवानगी कधी देणार त्याची. तत्कालीन सरपंच सौ. नीता संतोष पवार यांनी याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आ. दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे सदस्य मंगेश धुमाळ यांच्यासह प्रशासनातील विविध विभागाच्या अधिकार्यांकडे पाठपुरावा केला. अखेर खूप संघर्षानंतर वनविभागाने परवानगी दिली. आ. दीपक चव्हाण, मंगेश धुमाळ यांच्या पाठपुराव्यामुळे रस्त्याच्या कामासाठी एक कोटी 33 लाखांचा निधी मंजूर झाला. आता रस्त्याचे काम मार्गी लागेल अशी अपेक्षा होती. मात्र या रस्त्याला कोणाची दृष्ट लागली समजले नाही. इतकी वर्षे हालअपेष्टा सहन केल्या चवणेश्वर ग्रामस्थांनी मात्र या रस्त्याचे टेंडर मिळवण्यासाठी अनेक ठेकेदार सरसावले. काम मोठे असल्याने तसा ठेकेदारही लागणार असल्याने काम कोणास मिळणार याची उत्सुकता होती.
चवणेश्वर रस्त्याचे काम आपल्याच बगलबच्च्याला मिळावे, यासाठी अनेकांनी शर्थीचे प्रयत्न केले. ज्यांच्याकडे परिपूर्ण अशी यंत्रसामुर्गी आहे अशा ठेकेदारांना जरा थांबा असा निरोप गेला. मात्र ज्या ठेकेदारांची शिफारस गेली ते ठेकेदार दोन लाख 57 हजार रुपये अनामत वेळेत भरु शकले नाहीत. एवढी रक्कम जुळत नसेल तर सव्वा कोटीच्या कामाचे काय झाले असते हा विचारच न केलेला बरा. अनामत रक्कम वेळेत भरली नाही त्यातच करोनाचे संकट उभे ठाकले. ठेकेदाराकडून दिरंगाई म्हणा किंवा जिल्हा परिषद प्रशासनाकडून दुर्लक्ष झाले म्हणा पण शेवटी हालअपेष्टा चवणेश्वर ग्रामस्थ आणि याठिकाणी येणार्या भाविक, पर्यटकांनाच सहन कराव्या लागणार आहेत. लोकप्रतिनिधी केवळ निवडणुकीच्या निमित्ताने येतील जातील पण येथील मुळचा प्रश्न तसाच राहिल्याचे शल्य त्यांच्या मनात राहिले पाहिजे. अखर्चित निधी शासनाने मागवला त्यात या रस्त्याचा निधी परत गेला. या पापात आपण तर सहभागी नाही ना याचा विचार सर्वांनीच करावा लागणार आहे.
चवणेश्वर ग्रामस्थांचा केवळ मतासाठीच लोकप्रतिनिधींनी वापर केला असून आता आम्ही गप्प बसणार नाही. येथील ग्रामस्थांना रस्त्यासाठी 60 वर्षे संघर्ष करावा लागत असून ही बाब लोकप्रतिनिधींना न शोभणारी आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया चवणेश्वर येथील हरीदास शेरे यांनी व्यक्त केली आहे. भाविक, पर्यटकांच्या रोषाचा सामना आगामी काळात लोकप्रतिनिधींना निश्चितच करावा लागणार असल्याचे यावरुन दिसत असून गेलेला निधी कोण परत आणणार? याचीच उत्सुकता लागून राहिली आहे.
चवणेश्वर ग्रामपंचायत यापूर्वी ग्रुप ग्रामपंचायत होती. ग्रामपंचायत स्वतंत्र झाल्यानंतर तत्कालिन सरपंच रामचंद्र पवार, सदाशिव शेरे, सुरेश सुर्यवंशी, सौ. निता पवार यांनी विविध पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला. आम्हीही हाच पाठपुरावा पुढे सुरु ठेवला. मात्र चवणेश्वर रस्त्याचा निधी परत गेल्याचे समजल्यावर खूप वाईट वाटले. या प्रक्रियेत ज्यांच्याकडून दुर्लक्ष झाले त्यांना चवणेश्वर ग्रामस्थ, भाविक आणि याठिकाणी येणारे पर्यटक कधीही माफ करणार नाहीत. ज्यांच्याकडून ही गंभीर चूक झाली त्यांनी चूक सुधारुन चवणेश्वर आपणावर कोपू नये याची खबरदारी घ्यावी.
– दयानंद शेरे (सरपंच ग्रामपंचायत चवणेश्वर)