श्रीनिवास पाटील यांनी दोन वेळा खासदारपद, राज्यपालपद भूषवले, पृथ्वीराजबाबांच्याकडे पंतप्रधान कार्यालय , खासदारकी एवढेच नव्हे तर राज्याचे मुख्यमंत्रीपद होते. एवढी मोठी पदे असताना त्यांनी जिल्ह्यासाठी काय केले? असा प्रश्न सातारा लोकसभा मतदारसंघाचे भाजप व मित्र पक्षाचे उमेदवार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केला. दरम्यान जिल्ह्यातील जनतेच्या विकासासाठी शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी
दिली.
उदयनराजे पुढे म्हणाले, सातारा जिल्ह्यातील जनतेच्या विकासाला आम्ही नेहमीच प्राधान्य दिले आहे. आम्ही ज्यांच्याबरोबर यापूर्वी काम केले त्यांनी आमचा केवळ नावासाठी वापर करून घेतला. प्रत्येक वेळी आम्हाला अडचणी निर्माण करण्यात आल्या. तरीदेखील आम्ही सातारा जिल्ह्याच्या विकासाला प्राधान्य दिले. आम्ही काय विकास केला असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी खासदार श्रीनिवास पाटील म्हणत असले तरी त्यांना माझे सांगणे आहे की पृथ्वीराजबाबा तुम्ही पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री होता,खासदार होता एवढेच नव्हे तर महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याचे तुम्ही मुख्यमंत्री होता, मग तुम्ही जिल्ह्याच्या विकासासाठी काय केले? कोणते मोठे काम तुम्ही केले? ते तुम्ही सांगावे मगच आमच्यावर टीका करावी. श्रीनिवास पाटील हे दोनदा खासदार होते, सिक्कीमचे राज्यपाल होते .एवढी मोठी पदे असताना असताना त्यांनी जिल्ह्याच्या विकासात
काय योगदान दिले? याची त्यांनी माहिती देणे गरजेचे आहे. याउलट आम्ही सातारा जिल्ह्यातील विविध प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे .त्यामुळे सलग
तीन वेळा या जनतेने आम्हाला मताधिक्याने त विजय केले आहे. यावेळीही जनतेची साथ निश्चितच आपल्या मिळेल, असा विश्वास उदयनराजे यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यातील जनतेने नेहमीच माझी पाठराखण केली आहे. तुंम्ही नसता तर मी नसतो. माझी पाठराखण करून मला साथ दिली. आज जे काही मी आहे
त्याचे सर्व श्रेय जनतेला आहे . नेहमीच राजकारणापेक्षा समाजकारणाला मी प्राधान्य दिले आहे, मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीने चुकीच्या पद्धतीने राजकारण केले. कृष्णा खोऱ्याचा प्रश्न त्यांना मार्गी लावता आला नाही. त्यामुळे आजही अनेक भागात दुष्काळी परिस्थिती आहे. तरुण पिढी विकासापासून वंचित ठेवण्याचे काम करत मूठभर लोकांनी स्वार्थ साधला. शेतकऱ्यांच्या मालकीचा असलेला जरंडेश्वर कारखाना त्यांनी गिळंकृत केला. आपण तरुण पिढीचे आयुष्य असेच जाऊ वाया जाऊ देणार का? याचा विचार आपण करणे गरजेचे आहे. जिथे जिथे अन्याय होतो तिथे मी धावून जातो. तुमच्यासाठी मी जीवात जीव असेपर्यंत लढत राहणार आहे.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देशात, राज्यात वेगळे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातही वेगळे चित्र
यावेळेस दिसणार आहे. हा जिल्हा तुमच्या, आमच्या ताब्यात येणार आहे. एक वेळ पुन्हा संधी द्या, एक वर्षात जिल्ह्याच्या विकासात बदल घडवून आणतो,असेही
उदयनराजे भोसले म्हणाले.
महेश शिंदे म्हणाले, सातारा जिल्ह्यात महायुतीची लाट असून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. त्यामुळे आता भावनिकतेचा प्रश्न करण्याचा प्रयत्न
होत आहे. शेतकऱ्यांचा असलेला जरंडेश्वर कारखाना का गेला याचे उत्तर विद्यमान आमदारांनी देण्याची गरज आहे. यशवंतराव चव्हाण यांचे नाव घेण्याची तुमची
लायकी नसून २४ तारखेनंतर कुठला मायचा लाल शेतकर्यांवर अन्याय करणार नाही. महाराजसाहेब आपले महावितरणचे कार्यालय शशिकांत शिंदे पालकमंत्री
असताना बारामतीला गेले, ते परत आणायचे आहे.यावेळेस सातारा जिल्ह्यात भाजप व मित्रपक्षांचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वासही
त्यांनी व्यक्त केला.
सुनील काटकर म्हणाले, उदयनराजे भोसले यांनी मतदार संघात विकासाचे पर्व निर्माण केले आहे. मात्र गेल्यावेळी अपेक्षित मताधिक्य मिळाले नसल्याची खंत महाराजांनी बोलून दाखवली. यावेळी कार्यकर्त्यांनी गाफील न राहता मोठे मताधिक्य देऊन रुसवे-फुगवे बाजूला ठेवून एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन त्यांनी
केले.