कोरेगाव तालुक्यात १० बॉम्ब सापडले*
कवाडेवाडी ता. कोरेगाव येथे तब्बल 10 बॉम्ब सापडले असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सातारा पोलिस दलातील बॉम्ब शोधक पथक व श्वान पथकाने (डॉग स्कॉड) हे सर्व बॉम्ब निकामी केले आहेत. हे सर्व गावठी बॉम्ब असून शिकारीसाठी त्यांचा वापर होत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.याबाबत प्राथमिक माहिती अशी की, रविवारी सकाळी कवाडेवाडी येथे बॉम्ब असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या घटनेने पोलिस हडबडून गेले. तत्काळ बॉम्ब शोधक पथकासह डॉग स्कॉड घटनास्थळी दाखल झाले.
वाठार पोलिस ठाण्याच्या हद्दीत डोंगरावर पोलिसांची शोध मोहिम सुरु झाली. सकाळी सुरु झालेले हे सर्च ऑपरेशन दुपारपर्यंत सुरु होते. कवाडेवाडी गावच्या हद्दीत बॉम्ब असल्याची माहिती पसरल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले व बघ्यांची गर्दीही उसळली होती. सुमारे 4 तासाहून अधिक काळ बॉम्ब शोधण्याची मोहिम राबवल्यानंतर प्राथमिक माहितीनुसार 10 हून अधिक बॉम्ब पोलिसांना सापडले.
सातारा पोलिस दलाने सर्व गावठी बॉम्ब शोधून काढल्यानंतर त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पोलिसांचा दुपारपर्यंत घटनास्थळाचा पंचनामा सुरु होता. सर्व घटनेची माहिती घेवून संशयितांचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू होती.