शिवमय वातावरणात प्रतापगडावर छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधुन पुष्पवर्षाव; उत्साहात साजरा झाला शिवप्रताप दिन

67
Adv

छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, ढोल ताशांचा रोमांचकारी गजर, तुता-यांचा रोमांच उभा करणारा आवाज, शिवकालीन धाडशी खेळांचे अंगावर शहारे आणणारे प्रात्यक्षिकासह छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधुन पुष्पवृष्टी करुन अलोट उत्साहात आज किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला. आज पहाटे पासूनच या मंगलमय वातावरणाने आणि हजारो शिवप्रेमी लोकांनी हा परिसर भारुन गेला होता. 
                 आज सकाळी सातारा जिल्ह्याचे प्रभारी जिल्हाधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात आई भवानी मातेची मंत्रोच्चाराच्या गजरात षोडशोपचार पुजा बांधण्यात आली.  भवानी मातेचे पुराणीक नरहर हडप गुरुजी आणि विजय हवालदार यांनी पौरोहित्य केले. त्यानंतर प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्या हस्ते आई भवानीची मनोभावे आरती करण्यात आली.
                भवानी मातेच्या मंदिरासमोरील ध्वजस्तंभाचे मान्यवरांच्या ह्रस्ते विधिवत पूजन करुन शिवशाहीचे प्रतीक असणाऱ्या भगव्या ध्वजाचे रोहण कुंभरोशीचे सरपंच रविकांत मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.  त्यावेळी ढोल, तुताऱ्या, लेझीम यांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला. यावेळी पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, अप्पर पोलीस अधिक्षक धिरज पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंग-ठाकूर, वाईच्या प्रांताधिकारी संगीता राजापूरकर, कोरेगाव प्रांताधिकारी किर्ती नलावडे, उपजिल्हाधिकारी विद्यूत वरखेडकर, महाबळेश्वरच्या मुख्याधिकारी अमिता दगडे, आदी उपस्थित होते.
                त्यानंतर मानाच्या पालखीची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली.  छत्रपतींची मूर्ती असलेल्या या पालखीची वाजत गाजत मिरवणूक सुरु झाली. प्रभारी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, यांच्यासह सर्व उपस्थित मान्यवरांनी पालखी घेऊन मिरवणूक मार्गस्थ केली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जावली, वाडा कुंभरोशीच्या विद्यार्थी, विद्यार्थीनींचे लेझीम- तुताऱ्या, स्वराज्य मराठा ढोल ताशा पथक, काठीवर चालणारी मुले, आई भवानी मातेचा व शिवरायांचा जयजयकार करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घेाषणांनी मिरवणूक मार्ग दुमदूमून गेला.
                पालखीचे शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याजवळ आगमन झाल्यावर प्रभारी जिल्हाधिकारी श्री. शिंदे यांच्या हस्ते पुष्प अर्पण करुन भक्तिभावे पूजन करण्यात आले.  यावेळी ‘क्षत्रिय कुलावतंस, राजाधिराज…., या ललकारींने,  शिवरायांच्या जयजयकाराच्या घोषणांनी वातावरण भारुन गेले होते. शिवपुतळयावरील ध्वजस्तंभावर मान्यवरांच्या हस्ते ध्वजांचे पुजन करुन प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्या हस्ते भगव्याचे ध्वजारोहण केले.  यानंतर सातारा पोलीस दलाच्या बॅण्ड पथकाने विविध धून वाजवून मानवंदना दिली.

Adv