राज्यातील नागरिकांचे चार महिन्यांचे वीज बिल माफ करावे! आम आदमी पार्टीतर्फे मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

56
Adv

कोरोना विषाणूच्या संकटामुळे देशभर लॉक डाऊन जाहीर करण्यात आले आहे. या लॉक डाऊनमुळे सर्व छोटे व्यावसायिक, असंघटीत क्षेत्रातील कामगार, बांधकाम मजूर यांच्यापुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यामुळे व्यापारी, कामगार, शेतकरी, गरीब, सूक्ष्म उद्योजक, दुकानदार यांना 200 युनिटपर्यंतचे वीज बिल माफ करण्याची मागणी आम आदमी पार्टीचे पश्‍चिम महाराष्ट्र खजिनदार सरदार उर्फ सागर भोगावकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात असे म्हटले आहे की, लॉक डाऊनमुळे मागील अडीच महिन्यांपासून राज्यातील उद्योग, व्यापार व बाजारपेठा पूर्णपणे बंद होत्या. त्यामुळे हातावर पोट असलेला मजूर वर्ग हा घरी बसून आहे. उत्पन्नाचे काहीही स्त्रोत नसल्याने त्यांच्यापुढे एकवेळच्या जेवणाची अडचण आहे. अशा स्थितीत त्यांना वीज बिल भरावयास लावणे हे अन्याय करणारे ठरणार आहे. तब्बल 85 टक्के मजूर, कामगार हे असंघटीत क्षेत्रात आहेत. त्यांना या काळातील पगार मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे या सर्व वर्गासाठी पहिले 200 युनिट वीज बिल माफ केल्यास त्यांना थोडातरी दिलासा मिळू शकतो, असे प्रतिपादन आम आदमी पार्टीचे पश्‍चिम महाराष्ट्र खजिनदार सरदार उर्फ सागर भोगावकर यांनी केले आहे. ते पुढे म्हणाले, सर्व कामगारांचा लॉक डाऊन काळातील पगार मालकांनी, ठेकेदारांनी करावा, असे आवाहन सरकार करते आहे. परंतू या आवाहनाला कितपत प्रतिसाद मिळतोय हे आपण जाणू शकता. आज सर्वसामान्यांपासून व्यापारी, व्यवसायिकांपर्यंत सर्वांचेच आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यातील ज्या नागरिकांच्या विजेची खपत 200 युनिटपेक्षा कमी आहे, अशा नागरिकांचे चार महिन्यांचे वीज बिल माफ करावे. जेणेकरुन त्यांना दिलासा मिळेल. ही आदमी पार्टीचीच नव्हे तर राज्यातील समस्त जनतेची मागणी आहे.
दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारने गेल्या दोन वर्षापासून 200 युनिटपर्यंतची वीज ग्राहकांना मोफत दिली आहे. त्याच धर्तीवर आपणही याबाबत विचार करुन राज्यातील 200 युनिटपर्यंतचे चार महिन्यांचे वीज बिल माफ करण्याची घोषणा करावी. याबाबत आपण विचार न केल्यास नाईलाजास्तव राज्यातील जनतेला सोबत घेवून आम आदमी पार्टीला रस्त्यावर उतरुन आंदोलन करावे लागेल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

Adv