छत्रपती शिवरायांचे थेट तेरावे वंशज असलेल्या श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे नेहमीच सर्वसामान्य जनतेशी जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत मात्र गेल्या काही वर्षांमध्ये त्यांच्या सभोवतालच्या अष्टप्रधान मंडळामुळे उदयनराजेंचा सर्वसामान्यांची संपर्क जरा कमी झाला आहे. त्यामुळे राजे अष्टप्रधानमंडळ बाजूला करून सर्वसामान्यांची पूर्वीप्रमाणेच संबंध प्रस्थापित करा,अशी मागणी उदयनराजे प्रेमींमधून होत आहे.
जनता हाच आपला पक्ष मानून श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पहिल्यापासून कामकाज केले आहे.पक्ष, सत्ता, पद यापेक्षा सर्वसामान्य जनतेसाठी मी 365 दिवस कार्यरत असल्याचे उदयनराजे नेहमी सांगतात, त्यामुळे सातारा जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्र व संपूर्ण देशभरात उदयनराजेंना मानणारा आणि त्यांच्यावर श्रद्धा असणारा मोठा वर्ग आहे. छत्रपतींचे वारसदार म्हणून त्यांना नेहमीच सर्व पक्ष्यांकडून सन्मानाची वागणूक मिळत आलेली आहे. उदयनराजे यांनीही जनता हेच आपले सर्वस्व मानून काम केल्यामुळे जनता हीच लोकशाहीतील राजे असल्याचे ते नेहमी सांगतात.
त्यामुळे उदयनराजे आणि सामान्य जनता असे समीकरण नेहमीच पाहायला मिळाले आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये उदयनराजेंभोवती असलेल्या अष्टप्रधान मंडळामुळे सर्वसामान्य जनतेला थेट उदयनराजेंना भेटता येत नाही. जिल्ह्याचे प्रश्न नागरिकांना मांडता येत नाहीत. त्यामुळे अष्टप्रधानमंडळाबाबत सर्वसामान्य जनतेमध्ये नाराजीचा सूर आहे.
जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक आपल्या व्यथा मांडण्यासाठी आले असता अनेकदा त्यांची भेट घडू दिली जात नाही .त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये असलेल्या नाराजीचा फटका उदयनराजे यांना लोकसभा पोटनिवडणुकीत बसला असल्याचे दिसत आहे.
उदयनराजे हे सर्वसामान्यांना अभिप्रेत असणारा विकास करण्यासाठी नेहमीच पुढे असतात. मात्र अष्टप्रधान मंडळामुळे सर्वसामान्य जनता उदयनराजेंच्या भेटीपासून दूर राहत असेल तर त्याचा निश्चितच फटका उदयनराजे यांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजे अष्टप्रधानमंडळ हटवा आणि पूर्वीप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांना भेटा, अशी मागणी उदयनराजे प्रेमींमधून होत आहे.