बदलत्या राजकीय स्थितीत शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांच्या रूपाने महाबळेश्वर तालुक्यालाच नव्हे, तर सातारा जिल्ह्याला मुख्यमंत्रिपदाची संधी पुन्हा एकदा चालून आली आहे. राज्यातील जनतेला सरकारची तर महाबळेश्वर तालुकावासीयांना एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या घोषणेची आस लागून राहिली आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील दरे तांब या कोयनाकाठचा एक शिवसैनिक मुंबईसारख्या मायानगरीत चाकरीसाठी जाऊन आपल्या कुटुंबाच्या उदारनिर्वाहाबरोबरच सामाजिक सेवेत सक्रिय होतो. तत्कालीन शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या कार्याने प्रभावित होऊन काम करीत असताना शिवसैनिक, शाखाप्रमुख, आमदार, मंत्री आणि गटनेतेपदाच्या कार्याचा हा उंचावता आलेख त्यांना मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्रिपदापर्यंत घेऊन जाणारा आहे.
राज्यात कुठलीही सत्ता आली तरी शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत असल्याने शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे आमदार शिंदे या साताऱ्याच्या मातीतील सुपुत्राला या पदाची संधी चालून आली आहे. यापूर्वी साताऱ्याच्या भूमीतील यशवंतराव चव्हाण यांनी मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री म्हणून 1956 ते 1960 आणि त्यानंतर प्रथमच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून 1960 ते 1966 काळात संधी लाभली. त्यानंतर कलेढोण (ता.खटाव) येथील बॅरिस्टर बाबासाहेब भोसले यांना संधी मिळाली. पृथ्वीराज चव्हाण यांना 2010 ते 2014 अशी मुख्यमंत्रिपदाची संधी लाभली. या भूमिपुत्रांना राज्याचे नेतृत्वाची संधी लाभली आहे.
आता महाबळेश्वरच्या मातीतील एकनाथ शिंदे या नेत्याला राज्याचे नेतृत्वाची संधी आली आहे. प्राप्त परिस्थितीनुसार आता शिवसेनेच्या गटनेतेपदावर त्यांनी मोहोर उमटवली आहे. आता सातारकरांना मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्रिपदाची उत्सुकता लागून राहिली आहे.
शिवसेनेच्या माध्यमातून समाजकारण आणि राजकारणाच्या अनुभवाच्या जोरावर पक्षासाठी कष्ट घेतलेल्या शिंदे यांना आता त्यांच्या कष्टाचे चीज मिळणार आहे. महाबळेश्वरच्या जनतेने त्यांच्यासाठी देवाला साकडे घातले असून, त्यांच्या पदाच्या बातमीची आतुरता सर्वांना लागून राहिली आहे.
शिवसेनेने आदित्य ठाकरे यांच्यासाठी आग्रह धरला असला तरी शेवटी अनुभवाच्या जोरावर एकनाथ शिंदे यांना संधी मिळण्याची दाट शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे शिंदे मुख्यमंत्री होणार का ? की त्यांना चांगले मंत्रिपद मिळणार, याकडे सर्वांच्या नजरा आहेत. याचीच सर्वत्र चर्चा चालू आहे.
एकनाथ शिंदे यांची शिवसैनिक ते आमदार , मंत्री आणि गटनेता ही त्यांची वाटचाल संघर्षातील आहे. साधा आणि स्पष्टवक्त स्वभावामुळे त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सदैव चळवळीत ठेवल्याने ते इथपर्यंत पोचले आहेत. अनुभवाच्या जोरावर आता त्यांना मुख्यमंत्रिपदाची संधी खुणावत आहे. ती मिळाल्यास त्यांच्यामुळे महाबळेश्वर तालुक्याचा बहुमान होणार आहे.